Cristiano Ronaldo leaves Manchester United : एकीकडे फुटबॉलचा महासंग्राम फिफा विश्वचषक (Fifa World Cup 2022) सुरु असताना फुटबॉल जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो(Cristiano Ronaldo) मँचेस्टर युनायटेड (Manchester United) क्लबपासून वेगळा झाला आहे. दोघांच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचं क्लबनं सांगितलं आहे. मँचेस्टर युनायटेडनं त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन हे ट्वीट केलं आहे. काही दिवसांपूर्वीच रोनाल्डोने एका मुलाखतीत क्लबवर खासकरुन क्लबचे मॅनेजर एरिक यांच्यावर आरोप केले होते, ज्याचे पडसाद आता उमटल्याचं दिसून येत आहे.


क्लबने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मँचेस्टर युनायटेड परस्पर कराराने हा निर्णय घेत असून तात्काळ रोनाल्डो क्लबपासून वेगळा होत आहे. तसंच क्लबमध्ये त्याच्या दोन्ही कारकिर्दीबद्दल आम्ही आभार मानतो. त्याने क्लबकडून 346 सामन्यांम्ध्ये 145 गोल केल्याबद्दल क्लब त्याचे आभार मानतो आणि त्याला आणि त्याच्या कुटुंबाला भविष्यासाठी शुभेच्छा देतो. तसंच मँचेस्टर युनायटेडमधील प्रत्येकजण एरिक टेन हॅगच्या नेतृत्वाखाली संघाची प्रगती सुरू ठेवण्यावर आणि संघाला आणखी यश मिळवून देण्यासाठी एकत्र काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. 






रोनाल्डोच्या 'त्या' वक्तव्याचे उमटले पडसाद


रोनाल्डोने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत मँचेस्टर युनायटेडच्या व्यवस्थापनावर अनेक आरोप केले होके. मँचेस्टर युनायटेडचे मॅनेजर एरिक टेन हॅगसह (Ten Hag) काही लोक आहेत, जे मला क्लबमध्ये पाहू इच्छित नसल्याचं रोनाल्डोनं म्हटलं होतं. ज्यानंतर क्लबनं स्पष्टीकरण देत सध्यातरी आम्ही यावर काहीच बोलणार नाही असं म्हटलं होतं. पण आज क्लबनं थेट हे ट्वीट करत आपला निर्णय दर्शवला असून रोनाल्डो आपली प्रतिक्रिया काय आणि कधी देणार याकडे फुटबॉल जगताचं लक्ष लागून आहे. रोनाल्डोने 12 वर्षांनंतर 2021 मध्ये पुन्हा मँचेस्टर युनायटेडमध्ये प्रवेश केला होता. त्याआधी 2003 ते 2009 तो मँचेस्टर संघासोबत होता. ज्यानंतर तो रिअल माद्रिद आणि युव्हेंटसकडूनही खेळला. 


हे देखील वाचा-