मुंबई: 2007 साली ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आणि 2011 साली वन डेच्या विश्वचषकावर भारताचं नाव कोरणारा 'कॅप्टन कूल' अशी महेंद्रसिंग धोनी याची ख्याती आहे. वयाच्या 37 व्या वर्षीही धोनीची चपळाई आणि काटकता तुम्हाला तोंडात बोटं घालायला लावते. वाढदिवसाच्या निमित्ताने धोनीच्या कारकीर्दीतील मैलाच्या दगडांचा आढावा.

  • क्रिकेटमध्ये अशी कोणतीही ट्रॉफी नाही जी धोनीच्या नावे नाही.

  • धोनीच्या नेतृत्त्वात भारताने वन डे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

  • ट्वेण्टी ट्वेण्टीमध्ये धोनीने विश्वचषक, आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगवर नाव कोरलं आहे.


धोनीचे 6 ‘बेमिसाल’ निर्णय

1) जोगिंदर शर्माला हिरो बनवलं

टी ट्वेण्टी विश्वचषक 2007 ची फायनल कोणीही भारतीय विसरु शकणार नाही. अंतिम सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती, तर  भारताला अवघ्या एक विकेटची गरज होती.



समोर पाकिस्तानचा हुकमी फलंदाज मिसबाह उल हक होता. यावेळी धोनीने अनुभवी हरभजन सिंहऐवजी नवखा गोलंदाज जोगिंदर शर्माच्या हाती बॉल सोपवून विश्वास दाखवला.

जोगिंदरने तिसऱ्याच चेंडूवर मिसबाहची विकेट घेतली आणि धोनीचा विश्वास सार्थ ठरवला. भारताने विश्वचषक जिंकला.

2) बॉल आऊटमध्ये चलाखी

2007 च्या टी ट्वेण्टी विश्वचषकात पहिल्या फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना टाय झाला. नियमानुसार या सामन्याचा निर्णय बॉल आऊटने ठरणार होता. एका षटकात जो कोणी जास्तवेळा दांडी उडवेल, तो संघ जिंकणार होता.



यावेळी पाकिस्तानने कोणताही धोका न पत्करता आपले नियमित गोलंदाज मैदानात उतरवले. मात्र रिस्क घेण्यात पटाईत असलेल्या धोनीने नियमित गोलंदाजांऐवजी पार्ट टाईम गोलंदाजाला संधी दिली. पहिल्यांदा वीरेंद्र सेहवागकडे बॉल सोपवला, सेहवागने पहिल्याच बॉलवर दांडी गुल केली. त्यानंतर हरभजन सिंह आणि आश्चर्य म्हणजे रॉबिन उथप्पालाही बॉल टाकण्याची संधी धोनीने दिली.



3) धोनीचा सिक्सर, भारताचा विजय

वनडे विश्वचषकाची 2011 ची फायनलही भारतीयांच्या स्मरणात आहे. फायनलमध्ये श्रीलंकेच्या कुलसेखराच्या चेंडूवर धोनीने सिक्सर ठोकून भारताला विश्वचषक मिळवून दिला होता.



भारताने 28 वर्षांनी विश्वचषक जिंकला होता. फायनलमध्ये धोनीने नाबाद 91 धावा केल्या होत्या.  फायनलच्या सामन्यात धोनी फॉर्ममध्ये असलेल्या युवराज सिंहच्या अगोदर फलंदाजीसाठी आला होता. त्यामुळे सुरुवातील प्रत्येकाने युवराजऐवजी हा का आला, असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र धोनीने स्वत: कॅप्टन इनिंग खेळून सर्वांची शंका दूर केली होती.

त्यावेळी मैदानात सलामीवीर गौतम गंभीर होता, त्यामुळे उजवा-डावा हे सूत्र धोनीला कायम ठेवायचं होतं, त्यामुळे तो युवराजच्या आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता.

4) पार्टटाईम बॉलर युवराजवर विश्वास

क्रिकेटविश्वाला धाकड युवराज सिंहची ओळख त्याच्या खणखणीत फलंदाज अशी होती. मात्र धोनीने 2011 च्या विश्वचषकात युवराज सिंहचा नियमित गोलंदाजाप्रमाणे वापर केला. त्याचा परिणाम म्हणजे विरोधी फलंदाजी ढेपाळली आणि धोनीची चालाख खेळी यशस्वी ठरली.



युवराजने 9 सामन्यात 75 षटकं टाकली, त्यामध्ये त्याने गरजेच्यावेळी 15 विकेट्स घेतल्या. युवराजने उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम सामन्यात दोन-दोन विकेट घेतल्या.

5) अश्विन, रैना आणि जाडेजावर विश्वास

2011 च्या विश्वचषकात धोनीने सुरेश रैना आणि अश्विनला सुरुवातीच्या सामन्यात अक्षरश: लपवून ठेवलं असं म्हणावं लागेल. कारण अश्विन विश्वचषकात अवघे दोन सामने खेळला.

यामध्ये एक सामना उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्धचा होता. या सामन्यात धोनीने अश्विनपासून गोलंदाजीला सुरुवात केली. अश्विनने कांगारुंची लय बिघडून दोन विकेट घेतल्या.



दुसरीकडे सुरेश रैनानेही गरजेच्यावेळी ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद 34 तर पाकिस्तानविरुद्ध नाबाद 36 धावा केल्या.

याशिवाय धोनीने रवींद्र जाडेजावरही नेहमीच विश्वास दाखवला. जाडेजाकडून अष्टपैलू कामगिरी करुन घेण्याची क्षमता धोनीकडे होती.

6) रोहित शर्माचं नशीब पालटलं

टॅलेंटने भरलेला फलंदाज म्हणून रोहित शर्मा परिचित आहे. मात्र रोहित शर्मा त्याच्या कुवतीप्रमाणे फलंदाजी करत नव्हता. धोनीने रोहित शर्माला सलामीसाठी प्रमोट केलं आणि रोहित शर्माचं नशीब पालटलं.



सलामीवीर म्हणून रोहित शर्माने 50 सामन्यात 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. इतकंच नाही तर जगात कुणालाही न जमलेली कामगिरी म्हणजेच दोन द्विशतकंही झळकावली.

संबंधित बातम्या

धोनीचे 6 चलाख निर्णय, ज्याला तुम्हीही सॅल्युट कराल!


कर्णधारपद सोडण्यामागचा ‘कूल धोनी’चा मास्टर प्लान!


धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याची पाच कारणं


महेंद्रसिंह धोनीच्या क्रिकेट कारकीर्दीवर एक नजर


वन डे, टी20 च्या कर्णधारपदावरुन महेंद्रसिंह धोनी पायउतार


धोनीचे 6 ‘धाकड’ निर्णय, ज्याला तुम्हीही सॅल्युट कराल!


हे तीन विक्रम करणारा धोनी जगातील एकमेव कर्णधार!