मुंबई : 45 वर्षांपूर्वी, 24 एप्रिल 1973 दुपारी 1 वाजता, मुंबईतील शिवाजी पार्क जवळील रानडे रोडवर असणाऱ्या निर्मल नर्सिंग होममध्ये सचिन रमेश तेंडुलकरचा जन्म झाला होता. तेंडुलकरांच्या घरी 2.58 किलो वजनाच्या बाळाचं आगमन झालं होतं. हेच बाळ पुढे जाऊन त्याच्या अविश्वसनीय खेळाच्या जोरावर 'क्रिकेटचा देव' बनलं...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 45 वाढदिवस आहे. देशभरातूनच नव्हे जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
"मी त्याला टीव्हीवर खेळताना पाहिलं आणि त्याच्या टेक्निकचा चाहता बनलो. मी स्वत:ला खेळताना पाहू शकत नाही, पण असं वाटतंय हा खेळाडू अगदी तसाच खेळतो, जसं मी खेळत असे."
52 कसोटींमध्ये 99.94 सरासरीने 6996 धावा ठोकणारे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन यांचे हे शब्द कोणाबद्दल असतील तर ते फक्त क्रिकेटच्या देवाबाबतच.
सचिन रमेश तेंडुलकर...मास्टर ब्लास्टरने क्रिकेटला अलविदा करुन साडेतीन वर्ष झाली आहेत, पण मैदानात अजूनही सचिन...सचिन...चा आवाज घुमतो.
सचिनसोबत तुलना चुकीची
भारतीय संघाचा कर्णधार आणि भारतीय फलंदाजीचा कणा म्हणून उदयास आलेल्या विराट कोहलीची तुलना सचिनसोबत कितीही केली, तरी अनेक गोष्टींमध्ये सचिन आणि कोणाचीही तुलना होऊ शकत नाही.
सचिन केवळ पिचवरच बॅटिंग करत नसे, तर त्याचे काही ठेवणीतले शॉट प्रतिस्पर्धी संघाच्या मनाला आणि मेंदूलाही दुखापत करत असत.
त्या काळात सर्वात मजबूत संघ ऑस्ट्रेलियाचा होता. तर सचिनने सर्वात शानदार कामगिरी कांगारुंविरोधातच केली.
कांगारुंविरोधात तुफानी खेळी
कसोटी आणि वन डे क्रिकेटमध्ये सचिनने एकूण 100 शतकं ठोकली आहेत. त्यापैकी 20 ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहेत. 11 कसोटी आणि 9 वन डेमध्ये एकूण 6707 धावा.
हा तो काळ होता, जेव्हा ऑस्ट्रेलियाशिवाय इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे जलदगती गोलंदाज आग ओकत असत.
कसोटीमध्ये यादोन्ही संघांविरोधात सचिन तेंडुलकरची 14 शतकं आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधात सरासरी 55 च्या पार आहे. तर इंग्लंडच्या विरुद्ध 51 पेक्षा जास्त सरासरी आहे.
पण कर्णधारपदाचं मुकुट पेलवलं नाही
वन डे क्रिकेटमध्येही त्याची बॅट देशापेक्षा परदेशात जास्त तळपली. एकदिवसीय सामन्यात त्याने भारतीय मैदानात 20 शतकं ठोकली तर देशाबाहेर 29 शतकं.
असं म्हणतात की, "सचिनचा जन्मच फलंदाजीसाठी झाला होता. ही बाब खरंच वाटते. कारण भारतीय संघाचं नेतृत्त्व मिळवण्यासाठी खेळाडू नाही नाही ते करतात, ते सचिनला मिळालं. पण कर्णधारपदाचं काटेरी मुकुट त्याला पेलवला नाही."
25 कसोटी सामन्यात त्याने भारताचं नेतृत्त्व केलं. पण त्याच्या धावांची सरासरी कमी होऊन 51.35 एवढी झाली.
कर्णधारपदाच्या ओझ्याशिवाय त्याने 175 सामने खेळले, ज्यात त्याने 54.16 च्या सरासरीने 13,867 धावा ठोकल्या होत्या.
वन डेमध्येही हेच चित्र आहे. कर्णधार बनल्यावर 37.75 च्या सरासरीने 2454 धावा केल्या. पण संघातील केवळ एक फलंदाज म्हणून खेळताना त्याने 46.16 च्या सरासरीने 15972 धावा कुटल्या.
सचिनसारखा संयम आता कुठे?
ही गोष्ट फलंदाजीची आहे. मैदानावरील त्याच्या संयमाची, वागणुकीची आहे. तो क्रिकेटचा जेवढा आदर करत होता, की पंचांच्या चुकीच्या निर्णयावरही कोणतीही प्रतिक्रिया न देता पॅव्हेलियनमध्ये परतत असे. असं चित्र हल्ली फारच क्वचित दिसतं.
बाद झाल्यावर ना कधी राग, संताप. गोलंदाजाने कितीही भडकवलं तरी सचिन कधीच काही बोलला नाही. उत्तर दिलं ते त्याच्या बॅटने. त्याची बॅट कधी शांत राहिली नाही.
यामुळेच जगभरातील खेळाडू आणि मैदान त्याच्या सन्मानार्थ आजही झुकतात.
सचिनसारखा कोणी नाही!
सचिनला कितीही नावं द्या, उपमा द्या, पण त्याच्यासारखा दुसरा कोणीही बनणार नाही. त्याची जागा कोणीही घेणार नाही. त्याचे काही विक्रम मोडतील तर काही वर्षानुवर्षे तसेच कायम राहतील. मात्र जे स्थान सचिनला मिळालं ते इतक कोणालाही मिळणार नाही, हे नक्की.
सर डॉन ब्रॅडमॅन यांना सचिनमध्ये ते स्वत: दिसले आणि भारताला आशा. मैदानात स्ट्रेट ड्राईव्ह असो वा मध्यमवर्गीय कुटुंबातील संघर्षाची कहाणी, दोन्हीच्या बाबतीत सचिनचं उदाहरण दिलं जातं.
क्रिकेटमधील त्याच्या निवृत्तीमुळे भारत आणि क्रिकेटचं नुकसान झालं. हो, मात्र फायदा कोणाचा झाला असेल तर जगातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचा, कारण आता तो निवांत झोपू शकतो.
सचिन 'रेकॉर्ड' तेंडुलकर
200 कसोटी सामन्यात 15,921 धावा. यासोबतच 51 कसोटी शतक, 68 अर्धशतक
13,492 विक्रमी कसोटी धावा, चौथ्या क्रमांकावर फलंदाजी
463 वन डे सामान्यात 18,426 धावा. यात 49 शतक, 96 अर्धशतक
विश्वचषकात 2,278 धावा, एका विश्वचषकात (2003) 673 धावा
वन डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात 3,077 धावा, श्रीलंकेविरोधात 3133 धावा
वन डेमध्ये 200 नंबरपर्यंत पोहोचणारा पहिला फलंदाज
62 वेळा सामनावीराचा मानकरी, हा पण एक विक्रम