काही दिवसांपूर्वी टीम इंडियाचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी मी निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर तिन्ही फॉरमॅटसाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्याचा नक्कीच विचार केला असता असं म्हटलं होतं. त्याविषयी धोनीला विचारलं असता, त्यानं ही प्रतिक्रिया दिली.
मी खेळाची मजा लुटत असून, कर्णधारपदी कोणाची निवड करावी हा बीसीसीआयचा निर्णय आहे, असं धोनी म्हणाला.
35 चा झालोय, पण थकलेलो नाही, धोनीने ठणकावलं
"मी 35 वर्षांचा झाला असलो, तरीही फिटनेस माझी समस्या नाही. मला खेळाचा आनंद मिळत नाही असं नाही. मात्र कर्णधारपदाबाबत बीसीसीआयच बोलू शकेल", असं धोनी म्हणाला.
"एक कर्णधार म्हणून झिम्बाब्वे दौरा माझ्यासाठी नवा अनुभव असेल. कारण या मालिकेत अनेक खेळाडू नवे आहेत, ते माझ्यासोबत पहिल्यांदाच खेळत आहेत. त्यांच्यातील जमेची बाजू कोणती हे मला लवकरात लवकर जाणून घ्यावं लागेल" असंही धोनीने सांगितलं.
गोलंदाजी हीच भारताची जमेची बाजू
झिम्बाब्वेतील आगामी मालिकेत गोलंदाजी हीच भारताची जमेची बाजू असल्याचं टीम इंडियाचा वन डे कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं म्हटलंय. 11 जूनपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत तीन वन डे आणि तीन ट्वेन्टी20 सामन्यांचा समावेश आहे. या दौऱ्यासाठी भारतानं युवा खेळाडूंना संधी दिली असून, त्यात गोलंदाजांच्या फॉर्मविषयी धोनी आश्वस्त दिसला.
तीन वन डे, तीन टी 20
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यात तीन वन डे आणि तीन टी 20 सामने खेळणार आहे. 11 जूनपासून वन डे मालिकेला तर 18 जूनपासून टी ट्वेण्टी मालिकेला सुरुवात होईल.
झिम्बाब्वे दौऱ्याचं वेळापत्रक
11 जून – पहिला वन डे सामना
13 जून – दुसरा वन डे सामना
15 जून – तिसरा वन डे सामना
18 जून – पहिला टी-ट्वेन्टी सामना
20 जून – दुसरा टी-ट्वेन्टी सामना
22 जून – तिसरा टी-ट्वेन्टी सामना