मुंबई: वेस्टइंडिजमध्ये गेलेली टीम इंडिया सध्या बरीच मजामस्ती करताना दिसून येत आहे. याचवेळी काही खेळाडूंनी बिअर पार्टी केली असल्याचीही चर्चा आहे. कारण की, त्याचे काही फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले आहेत. त्यांचे हे फोटो बीसीसीआयपर्यंतही पोहचले. त्यानंतर बोर्डानं खेळाडूंना चांगलेच खडे बोल सुनावले असल्याचं समजतं आहे.

 

21 जुलैपासून वेस्टइंडिज विरुद्ध पहिली कसोटी सुरु होणार आहे. पण त्याआधीच टीम इंडियाच्या खेळाडूमनी आपले काही फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ते बरेच व्हायरल झाले आहेत.

 

वेस्टइंडिजमध्ये मजा-मस्ती करताना अनेक खेळाडू दिसून आले. त्यांचे बरेच फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले. पण यातील एका फोटोमध्ये टीम इंडियाचा युवा खेळाडू केएल राहुल, स्टुअर्ट बिन्नी आणि उमेश यादव हे सोबत दिसत आहेत. यामध्ये केएल राहुल आणि त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातात बिअरची बाटली दिसत आहे.

 

या फोटोनंतर टीम व्यवस्थापन आणि बीसीसीआयचे अधिकारी नाराज झाले. सुत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयने टीम मॅनेजर रियाज बगवान यांच्यामार्फत खेळाडूंना इशाराच देण्यात आला आहे. बीच आणि बिअर ही कॅरेबिअन संस्कृती आहे. ही भारताची संस्कृती नाही. बीसीसीआयचं मते, लहान मुलांसोबत लाखो क्रिकेट चाहते आहेत त्यांच्यावर या फोटोचा चांगला प्रभाव पडणार नाही. त्यामुळेच बीसीसीआयनं असा कडक इशारा खेळाडूंना दिला आहे.