नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे.  सभागृहात जनतेचे प्रश्न पोटतिडकीने कोणता खासदार मांडणार याकडे सर्वांचं लक्ष असेल.

 

केंद्रात मोदी सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष झाली आहेत. या दोन वर्षाच्या काळात महाराष्ट्रातील खासदारांनी छाप पाडल्याचं चित्र आहे. कारण सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या देशभरातील पहिल्या 10 खासदारांपैकी 9 खासदार हे महाराष्ट्रातील आहेत.  यामध्ये पहिल्या चारपैकी तीन खासदार राष्ट्रवादीचेच आहेत.

 

सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे अव्वल स्थानी आहेत, तर कोल्हापूरचे राष्ट्रवादीचेच खासदार धनंजय महाडिक हे दुसऱ्या क्रमांकवर आहेत. शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील तिसऱ्या, तर सोलापूरचे राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील चौथ्या नंबरवर आहेत.

 

इंडिया स्पेंड अनालिसिसने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

या दहा खासदारांमध्ये शिवसेनेचे 4, राष्ट्रवादीचे 3, तर काँग्रेस आणि भाजपच्या प्रत्येक एका खासदारांचा समावेश आहे.

 

राज्यात शिवसेनेचे 18, राष्ट्रवादीचे 4, काँग्रेसचे 2 तर भाजपचे 24 खासदार आहेत.

 

महत्त्वाचं म्हणजे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यासारख्या बड्या नेत्यांनी संसदेत एकही प्रश्न विचारलेला नाही.

 

तर एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही प्रश्न विचारण्यात आघाडी घेतली आहे.

 

सर्वाधिक प्रश्न विचारणारे देशातील खासदार

1) सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस खासदार, बारामती ) - 568 प्रश्न

2) धनंजय महाडिक (राष्ट्रवादी काँग्रेस खासदार, कोल्हापूर ) - 557 प्रश्न

3) शिवाजी आढळराव पाटील (शिवसेना खासदार, शिरुर) - 554 प्रश्न

4) विजयसिंह मोहिते पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस खासदार, माढा, सोलापूर ) - 531 प्रश्न

5) राजीव सातव (काँग्रेस खासदार, हिंगोली ) 519 प्रश्न

6) धर्मेंद्र यादव (समाजवादी पार्टी- उत्तरप्रदेश ) 512 प्रश्न

7) आनंदराव अडसूळ (शिवसेना खासदार, अमरावती ) 497 प्रश्न

8) डॉ. हीना गावित (भाजप खासदार, नंदुरबार ) 480 प्रश्न

9) राहुल शेवाळे (शिवसेना खासदार, मुंबई दक्षिण ) 474 प्रश्न

10) विनायक राऊत (शिवसेना खासदार, रत्नागिरी- सिंधुदुर्ग ) 470 प्रश्न