मुंबई : इंग्लंडमधल्या आगामी वन डे विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा 15 एप्रिल रोजी मुंबईत होणार आहे. आज झालेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद संघाची घोषणा करतील.

आयसीसीने विश्वचषकात सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 23 एप्रिलपर्यंत संघ जाहीर करण्याची मुदत दिली आहे. बीसीसीआयने या मुदतीच्या आठ दिवस अगोदरच संघ जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय संघात कर्णधार विराट कोहलीसह अनेक खेळाडूंची जागा निश्चित आहे. तर काही खेळाडू असे आहेत की निवड समितीने आपल्यावर विश्वास दाखवावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजावरुन निवड समितीची डोकेदुखी वाढली आहे. निवड समिती रिषभ पंत किंवा अंबाती रायुडू यांच्यावर विश्वास दाखवू शकते.

विजय शंकरनेही मागील काही महिन्यात दमदार कामगिरी केली आहे आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यालाही संघात जागा मिळू शकते. तसंच संघात चौथ्या फलंदाजाची जागाही रिकामी आहे आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी शानदर कामगिरी करणाऱ्या नवदीप सैनीवरही निवड समितीची नजर असेल.

विश्वचषकासाठी संघाची निवड करण्याआधी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मतही विचारलं जाईल.

दरम्यान, 30 मेपासून इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषकात भारताचा पहिला सामना 5 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर 16 जून रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रंगेल आहे.