नवी दिल्ली : 'बिहारी बाबू' अशी ओळख असलेले बॉलिवूड अभिनेते आणि नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा आज एबीपी न्यूजने आयोजित केलेल्या 'शिखर संमेलन 2019' या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात ते म्हणाले की, देशभरातून मला अनेक पक्षांकडून ऑफर्स आल्या होत्या. मला मायावती यांचा पक्ष बहुजन समाज पार्टीकडूनदेखील पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली होती. त्याशिवाय अखिलेश यादव यांचा पक्ष समाजवादी पार्टी, अरविंद केजरीवाल यांची पक्ष आम आदमी पार्टी, ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस या पक्षांसह महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील अनेक पक्षांकडून ऑफर्स मिळाल्या होत्या. परंतु खूप विचार केल्यानंतर मी काँग्रेसचा हात धरला.


आपल्या काँग्रेस प्रवेशाबाबत सिन्हा म्हणाले की, आपण ही गोष्ट विसरु नये की, काँग्रेस हा देशातला सर्वात मोठा आणि सर्वात जुना पक्ष आहे. काँग्रेसने देशाच्या विकासासाठी खूप काम केले आहे. आता काँग्रेसमध्ये आल्यानंतर मीसुद्धा काहीतरी करु शकेन.

सिन्हा म्हणाले की, राजकारणाचं दुसरं नाव तडजोड आहे. जे काल होतं ते आज नाही, जे आज आहे ते उद्या नसणार. माझं तिकीट कापण्यापूर्वी भाजपने मला एकदाही विचारण्याची तसदी घेतली नाही, त्यामुळेच मला पक्ष सोडावा लागला. शिखर संमेलन 2019 या कार्यक्रमात शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक मुद्द्यांवर स्वतःची मतं मांडली. यावेळी त्यांनी भाजपवर टीकादेखील केली.