मुंबई : चालू वर्षातलं (2019) आणि या दशकातलं (2010 ते 2019) शेवटचं सूर्यग्रहण सुरु झालं आहे. मुंबईतून सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी सूर्यग्रहणास सुरुवात झाली आहे. सकाळी 9 वाजून 22 मिनिटांनी ग्रहणमध्य होईल. तर सकाळी 10 वाजून 55 मिनिटांनी सूर्यग्रहण पूर्णपणे सुटेल. या सूर्यग्रहणाचा सध्या सुरु असलेल्या रणजी सामन्यांच्या आयोजनावर परिणाम झाला आहे.


बीसीसीआयने आजच्या सूर्यग्रहणामुळे सुरु असलेल्या रणजी सामन्यांच्या वेळेमध्ये बदल केला आहे. खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी बीसीसीआयने सामने उशिरा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली आहे.


बीसीआयने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आजच्या सूर्यग्रहणामुळे रणजी चषकातील सामन्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. सामने काही वेळ उशिराने सुरु होणार आहेत. खेळाडू आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करुन आम्ही हा निर्णय घेतला आहे.


रणजी चषकातील सामने सकाळी 9.30 वाजता सुरु होतात. आज मुंबई आणि राजकोट या संघांमध्ये साखळी फेरीतल्या सामन्याचा दुसरा दिवस आहे. परंतु सूर्यग्रहणामुळे हा सामना दोन तास उशिराने म्हणजेच 11.30 वाजता सुरु होईल.





ग्रहण कसे पाहावे?


उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण कधीही पाहू नये.
दुर्बिणी, साधे गॉगल्स, काळया काचा, एक्सरे फिल्मस, सीडी यातून ग्रहणे पाहू नयेत त्यामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
ग्रहण बघण्यासाठी बनवलेला ग्रहण चष्मा किंवा पिन होल कॅमेरा यातूनच ग्रहण पहावे. सूर्याकडे जास्त वेळ आणि एकटक पाहू नये.
काळी काच, काळा गॉगल, एक्स रे फिल्म, चंदेरी रंगाच्या अॅल्युमिनिअम फिल्मचे गॉगल यामध्ये सूर्याकडून येणारी हानिकारक अवरक्त व अतिनील प्रारणे शोषली जात नाहीत. ही सर्व साधने खूप स्वस्त असली व त्यातून सूर्य दिसत असला तरी त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्रहण बघण्यासाठी बनवलेल्या सुरक्षित ग्रहण चष्म्यातूनच ग्रहण बघावे, असे आवाहन लातूर विज्ञान केंद्रातर्फे केले आहे.


पुढील सूर्यग्रहण कधी?


2027 आणि 2028 साली खंडग्रास, तर 2031 साली कंकणाकृती ग्रहण भारतातून दिसेल. त्यामुळे यावर्षी 26 डिसेंबरला दिसणाऱ्या ग्रहणाचा अनुभव सर्वांनी घ्यावा. तसेच निसर्गातील विविध गोष्टी जसे झाडांची पाने, फुले, पशू, पक्षी यांच्या वर्तनात ग्रहण काळात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण नोंदवावे, त्यांची छायाचित्रे घ्यावीत.


ग्रहण म्हणजे काय?
जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत आणि एकाच प्रतलात येतात त्यावेळी त्यांच्यामध्ये एकप्रकारचा लपंडाव होतो. सावलीमुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्य पृथ्वीवरून काही काळासाठी दिसत नाही, त्याला सूर्यग्रहण म्हणतात. तर पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे काही काळ चंद्र दिसत नाही त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात.


सूर्यग्रहण कुठल्या प्रकारचे असतात?
ज्यावेळी चंद्रामुळे सूर्य पूर्णपणे झाकला जातो त्यास खग्रास सूर्यग्रहण म्हणले जाते. ज्यावेळी चंद्रा मुळे सूर्य मध्यभागात गोलाकृती आकारात झाकला जातो त्यास कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणले जाते. ज्यावेळी चंद्रा मुळे सूर्य अंशतः झाकला जातो त्यावेळी त्यास खंडग्रास सूर्यग्रहण म्हणले जाते.


यावेळेसचे ग्रहण कुठल्या प्रकारचे आहे?
26 डिसेंबर रोजी होणारे सूर्यग्रहण हे कंकणाकृती प्रकारचे आहे. परंतु ही कंकणाकृती अवस्था दक्षिण भारतातील केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू येथील ठराविक भागातच दिसणार असून, भारताच्या उर्वरित भागात खंडग्रास पद्धतीचे ग्रहण पहायला मिळेल. दक्षिण भारतात जास्तीत जास्त तीन मिनिट चाळीस सेकंद एवढ्या कालावधीसाठी सूर्याचा सुमारे 97 टक्के भाग झाकला जाईल. तर लातूरमध्ये दीड मिनिटांसाठी जास्तीत जास्त सुमारे 75 टक्के भाग झाकला गेलेला दिसेल.


ग्रहण केव्हा होते?
चंद्रग्रहण हे पौर्णिमेला तर सूर्यग्रहण हे नेहमीच अमावास्येला घडते. दर पौर्णिमा किंवा अमावास्येला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच प्रतालात नसतात त्यामुळे दर अमावस्या आणि पौर्णिमेला चंद्रग्रहण घडत नाही.


ग्रहण अशुभ असते काय?
प्राचीन काळी जेव्हा मनुष्याला खगोलशास्त्राविषयी विशेष ज्ञान नव्हते तेव्हा ग्रहणे का घडतात याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती. त्यामुळे चंद्र अथवा सूर्य अचानकपणे आकाशात दिसणे बंद झाल्याने लोक भयभीत होत असत. त्यामुळे ग्रहण म्हणजे आपल्यावर आलेले संकट अशी एक धारणा निर्माण झाली. त्यातूनच ग्रहण अशुभ किंवा अरिष्ट ही अंधश्रद्धा तयार झाली.


वास्तविक ग्रहणे हा निसर्गाचा अद्भुत आविष्कार असून तो सर्वांनी आवश्यक ती काळजी घेऊन समाजातील सर्वच घटकांनी ( गर्भवती स्त्रिया, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक) अनुभवला पाहिजे.


ग्रहणाची वेळ काय?
लातूर शहरातील ग्रहणाच्या वेळा खालील प्रमाणे:
सकाळी 8:०6 वाजता ग्रहण सुरू होईल ( स्पर्श) यात सूर्य झाकायला सुरुवात होईल.
सकाळी 9:26 वाजता ग्रहणाची सर्वाधिक अवस्था दिसून येईल (मध्य). लातूरात साधारणपणे 75 टक्के सूर्य झाकलेला दिसेल. ही अवस्था सुमारे दीड मिनिट राहील.
यानंतर झाकलेला सूर्य हळूहळू पूर्ववत दिसायला सुरुवात होईल. याला ग्रहण सुटणे असे म्हटले जाते.
सकाळी 11.03 वाजता सूर्य पूर्णपणे दिसू लागेल ( मोक्ष).


या ग्रहणाचे वैशिष्ठ काय?
दर वर्षात जास्तीत जास्त सात ग्रहणे अवकाशात घडून येऊ शकतात. त्यातील 4 ते 5 सूर्यग्रहण ग्रहणे तर 3 ते 4 चंद्रग्रहण ग्रहणे असतात. वर्षभरात किमान दोन वेळा तरी सूर्यग्रहण घडतेच. असे असले तरी सर्व ग्रहणे आपल्याला ( भारतातून) दिसतीलच असे नाही.


यावर्षी भारतातून दिसणारे हे शेवटचे ग्रहण असून, पुढच्याच वर्षी 21 जूनला आणखी एक कंकणाकृती ग्रहण भारतात दिसणार आहे. परंतु त्याकाळात मान्सूनमुळे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता नाकारता येणार नाही.


त्यानंतर 2027 आणि 2028 साली खंडग्रास, तर 2031 साली कंकणाकृती ग्रहण भारतातून दिसेल. त्यामुळे यावर्षी 26 डिसेंबरला दिसणाऱ्या ग्रहणाचा अनुभव सर्वांनी घ्यावा. तसेच निसर्गातील विविध गोष्टी जसे झाडांची पाने, फुले, पशू, पक्षी यांच्या वर्तनात ग्रहण काळात होणाऱ्या बदलाचे निरीक्षण नोंदवावे, त्यांची छायाचित्रे घ्यावीत असे आवाहन लातूर विज्ञान केंद्रातर्फे केले आहे.