हैदराबाद : देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), राष्ट्रीय नागरिक नोंदयादीबाबत (NRC) अफवा पसरत आहेत. केंद्र सरकार या अफवा दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु सरकार त्यात अपयशी ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. CAA आणि NRC वरुन विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. अशातच आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
भागवत म्हणाले की, जो व्यक्ती भारताला स्वतःची मातृभूमी मानतो, भारतातील जन, जल, जंगल, जमीन, जानवर (प्राणी)यांच्यासह संपूर्ण भारतावर प्रेम करतो, भारताची भक्ती करतो, भारताच्या उदार संस्कृतीला आपल्या जीवनात महत्त्वाचे स्थान देतो, अशी कुठलीही व्यक्ती जी कोणतीही भाषा बोलत असेल, कोणत्याही प्रांतातला असेल, कोणाचीही पूजा करत असेल, तो भारतमातेचा पूत्र हिंदू आहे. त्यामुळे भारतातले 130 कोटी लोक हे संघासाठी हिंदूच आहेत.
आपण सर्वांची प्रगती व्हावी यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे, या विचाराला जग हिंदू विचार मानते. हा भारताचा पंरपरागत विचार आहे. इथल्या मातीत जन्म घेणाऱ्या सर्वांच्या विचारधारेंचा हाच निष्कर्ष आहे. लोक म्हणतात की, आम्ही हिंदुत्ववादी आहोत, परंतु आम्ही परंपरेने हिंदुत्ववादी आहोत. त्यात काहीही बदलण्याची आवश्यकता नाही.
हैदराबादमधील शरुरनगर स्टेडियममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विजय संकल्प सभा झाली. या सभेदरम्यान संघाचे प्रमुख मोहन भागवत बोलत होते. यावेळी जवळजवळ 20 हजार कार्यकर्ते संघाच्या गणवेशात स्टेडियममध्ये उपस्थित होते.
भागवत यांनी यावेळी CAA कायद्याविरोधात हिंसक आंदोलनं करणाऱ्यांवरही टीका केली. भागवत म्हणाले की, काही लोक स्वतःच्या वैयक्तिक स्वर्थासाठी सामान्य लोकांना आपसात भांडण्यास भाग पाडत आहेत. लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लोकांचं सर्वांसमोरचं रुप वेगळं आणि खरं रुप वेगळं आहे.