मुंबई : भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेस पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. पुढच्या कधी आणि कोणत्या महिन्यात लिएंडर पेस निवृत्ती घेणार आहेत, याबाबत माहिती मिळालेली नाही. मात्र पेसने स्वत: निवृत्तीचे संकेत दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पेस डेविस कपच्या ड्रॉची वाट पाहत आहे. त्यानंतर लिएंडर पेस आपल्या निवृत्तीची तारीख जाहीर करु शकतो. आतंरराष्ट्रीय टेनिस कारकिर्दीचा शेवटचा सामना भारतीय संघासाठी कोलकातामध्ये खेळण्याची लिएंडर पेसची इच्छा आहे, अशी माहितीही समोर येत आहे.


लिएंडर पेसची टेनिस कारकिर्द


लिएंडर पेस डबल्स आणि मिक्स्ड डबल्समध्ये 18 ग्रॅन्डस्लॅम टायटल जिंकले आहेत. ऑलिम्पिक 1996 मध्ये कांस्य पदक पटकावलं होतं. एशियन गेम्समध्ये सात मेडल जिंकले आहेत, ज्यामध्ये पाच गोल्ड मेडल्सचा समावेश आहे. याशिवाय कॉमनवेल्थ गेम्समध्येही पेसने एक मेडल जिंकले आहे. यामुळेच लिएंडर पेसला आजवरचा सर्वात महान अॅथेलिट म्हणून ओळखलं जातं. तीन दशकांच्या आपल्या उत्त्कृष्ट कारकिर्दित लिएंडर पेसने असे अनेक कारनामे केले आहेत, ज्याची आजही चर्चा होते.


लिएंडर पेसने काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत आपल्या निवृत्तीचे संकेत दिले होते. त्यावेळी पेसने मी एक वर्षापेक्षा जास्त खेळणार नाही, असं म्हटलं होतं. मी आता 46 वर्षांचा झालो आहे. त्यामुळे आता माझ्या जागी नव्या खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे, असं लिएंडर पेसने म्हटलं होतं.