मुंबई : बीसीसीआयच्या भारतातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मीडिया हक्कांसाठीच्या ई-लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने बाजी मारली. 2018 ते 2023 या काळात होणाऱ्या सामन्यांसाठी स्टार इंडियाने 6138.11 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत हे मीडिया हक्क मिळवले.
स्टार इंडियाकडे जागतिक क्रिकेटमधील दोन मोठे मीडिया हक्क आहेत. आयसीसीचे आठ वर्षांचे आणि आता बीसीसीआयचे पुढील पाच वर्षांचे मीडिया हक्क स्टार इंडियाने मिळवले. यापूर्वी आयपीएलसाठीही स्टार इंडियाने 16 हजार 347.5 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत बाजी मारली होती.
सोनी पिक्चर्स, स्टार इंडिया आणि रिलायन्स या तीन समूहांमध्ये पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया हक्क मिळवण्यासाठी चुरस होती. पण शेवटी तीन दिवस चाललेल्या या लिलाव प्रक्रियेत स्टार इंडियाने सर्वाधिक बोली लावत भारतातल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे मीडिया हक्क आपल्या नावावर केले.
या शर्यतीत दुसऱ्या दिवसअखेर आलेली अखेरची बोली 6032.50 कोटी रुपयांची होती. तर पहिल्या दिवशी अखेरची बोली 4442 कोटी रुपयांची होती. 2012 साली स्टार इंडियाने बीसीसीआयला सहा वर्षांसाठी 3851 कोटी रुपये मोजले होते. या रकमेत आता 59.18 टक्यांची वाढ झाली आहे.
नव्या मीडिया हक्कांची सुरुवात 15 एप्रिलपासून सुरु होईल, तर 31 मार्च 2023 रोजी संपणार आहे. या मीडिया हक्कांमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघाचे मायदेशात होणाऱ्या सामन्यांचा समावेश आहे. बीसीसीआयने मीडिया हक्कांसाठी तीन वेगवेगळे फॉरमॅट बनवले होते. ज्यामध्ये भारत आणि जगभरातील क्रिकेटचे टीव्ही राईट्स, भारतातील डिजीटल राईट्स आणि ग्लोबल राईट्सचा समावेश होता. स्टारकडे हॉटस्टारच्या रुपात अगोदरच डिजीटल प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.
येत्या पाच वर्षात भारतीय संघ मायदेशात 102 सामने खेळणार आहे. यानुसार बीसीसीआयला एका सामन्याचे तब्बल 60 कोटी रुपये मिळतील. आंतरराष्ट्रीय सामन्यांची सरासरी रक्कम आयपीएल सामन्यांच्या सरासरी रकमेपेक्षा जास्त आहे. या काळात 2018 पासून 2022 पर्यंत आयपीएलच्या एका मॅचसाठी स्टार इंडिया सरासरी 54.5 कोटी रुपये देणार आहे.
यापूर्वी स्टार इंडियाने 1.9 बिलियन डॉलरमध्ये आयसीसीचे 8 वर्षांचे (2015-2023) मीडिया हक्क खरेदी केलेले आहेत. 2023 चा विश्वकपही भारतातच होणार आहे. त्यामुळे यापुढे भारतीय संघाचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील.
बीसीसीआय मालामाल, स्टार इंडिया एका सामन्याचे 60 कोटी रुपये देणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Apr 2018 06:29 PM (IST)
2018 ते 2023 या काळात होणाऱ्या सामन्यांसाठी स्टार इंडियाने 6138.11 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत हे मीडिया हक्क मिळवले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -