पाटणा : राजदचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यांच्या घरी सनई-चौघडे वाजण्याची चिन्हं आहेत. लालूंचे ज्येष्ठ पुत्र तेज प्रताप यादव लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचं वृत्त आहे. राजद आमदार आणि बिहारचे माजी मंत्री चंद्रिका राय यांच्या मुलीशी तेज प्रताप लग्न करणार आहेत.


चंद्रिका राय हे बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांचे पुत्र आहेत. बिहारमधील सारणमधल्या परसा विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. चंद्रिका यांच्या मुलीसोबत तेज प्रताप यादव पुढच्या महिन्यात लगीनगाठ बांधणार असल्याचं वृत्त आहे.

तेज प्रताप यांच्या लग्नाच्या वृत्ताला यादव कुटुंबच अधिकृत दुजोरा देईल, अशी प्रतिक्रिया राजदचे प्रवक्ते शक्ति सिंह यादव यांनी दिली. लालू साखरपुड्याला हजेरी लावतील, लवकरच ते तुरुंगातून बाहेर येतील, त्यांना न्याय मिळेल, असं शक्ति सिंह म्हणाले.

तेज प्रताप यांच्या लग्नाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. लालू प्रसाद यादव लेकाच्या लग्नाला हजेरी लावू शकणार का, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

काही महिन्यांपूर्वी तेज प्रताप यांना लग्नाबाबत छेडलं होतं, त्यावेळी आपल्यासाठी बायको शोधण्याची जबाबदारी सुशिल कुमार मोदी यांच्यावर आहे, असं उत्तर तेज प्रताप यादवांनी दिलं होतं. सुशील कुमार मोदी हे बिहारचे उपमुख्यमंत्री आहेत.

सुशील कुमार यांनी तेज प्रताप यांच्यासाठी बायको शोधण्याचं आव्हान स्वीकारताना काही ठेवल्या होत्या. हुंडा घेणार नाही, यापुढे कोणाच्याही लग्नात तोडफोड करणार नाही, या अटी मान्य असतील, तरच नवरी शोधेन, असं सुशील कुमार मोदी म्हणाले होते.