जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी जोधपूरच्या सत्र न्यायालयाने अभिनेता सलमान खानला दोषी ठरवलं. त्याला पाच वर्षांची शिक्षा आणि दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला. तर या प्रकरणातील इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या खटल्यात सलमान खानला शिक्षा देण्यात बिष्णोई समाजाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बिष्णोई समाज कोण आहे, ते पाहूया

29 नियमांचं पालन करणारा बिष्णोई समाज
खरंतर बिष्णोई समाज 29 नियमांचं पाल करतो. 29 नियमांचं पालन करत असल्यानेच बिष्णोई शब्द 20(बीस) आणि 9(नौ) बनतो. 1485 मध्ये गुरु जम्भेश्वर भगवान यांनी बिष्णोई समाजाची स्थापना केली होती. हा समाज वन्यजीवांना आपल्या कुटुंबाप्रमाणेच मानतो आणि पर्यावरण संरक्षणात या समाजाचं योगदान मोठं आहे.

या समाजाचे लोक जाती-पातीवर विश्वास ठेवत नाहीत.त्यामुळे हिंदू किंवा मुस्लीम दोन्ही धर्मातील लोक त्याचा स्वीकार करतात. सर्वच जाती-धर्माचे लोक या समाजाची दीक्षा घेतात.

महिला हरिणांच्या पाडसांना स्वत:च दूध पाजतात


बिष्णोई समाजाची महिला हरिणांच्या पाडसांना आपल्या मुलांसारखंच मानतात. हा समाज राजस्थानच्या मारवाडमध्ये आहे. निसर्गावर, विशेषत: हरिणावर या गावात अतोनात प्रेम केलं जातं. महत्त्वाचं म्हणजे पुरुषांना जंगल परिसरात एखादं हरिण किंवा हरिणाचं पाडस दिसलं तर ते त्यांना घरी घेऊन येतात. स्वत:च्या मुलांप्रमाणे त्यांची सगळी कामं करतात. इतकंच नाही तर महिला हरिणांच्या पाडसांना स्वत:चं दूध पाजतात. एका आईचं कर्तव्य त्या पार पाडतात. मागील 500 वर्षांपासून या समाज ही परंपरा पाळत आहे.

चिपको आंदोलनाची ठिणगी
हा समाज पर्यावरण प्रेमी आहे. 1736 साली जोधपूर जिल्ह्याच्या खेजडली गावात बिष्णोई समाजाचे 300 हून जास्त लोकांनी वृक्ष वाचवण्यासाठी आपले प्राण दिले. राजाच्या दरबारातील लोक या गावातील झाडं कापण्यासाठी आले होते. पण विरोध म्हणून या समाजाच्या लोकांनी झाडांना मिठी मारली. या समाजाच्या 300 पेक्षा लोकांना शहीदाचा दर्जा देण्यात आला आहे. या आंदोलनाच्या नायिका अमृता देवी, ज्यांच्या नावावर आजही राज्य सरकार अनेक पुरस्कार देतं.



जोधपूर, बीकानेरमध्ये समाजाची मंदिरं
राजस्थानमध्ये जोधपूर आणि बीकानेरमध्ये या समाजाची मंदिरं मोठ्या प्रमाणात आहेत. मुकाम नावाच्या ठिकाणी या समाजाचं मुख्य मंदिर आहे. इथे दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या आमावस्येला मोठी जत्रा भरते, जिथे हजारो लोक सहभागी होतात.

काळवीटाच्या शिकारीवर बंदी


काळवीट भारत, नेपाळ आणि पाकिस्तानमध्ये आढळणारी हरिणाची एक प्रजात आहे. काळवीट मुख्यत: भारतात प्रमाणात आढळतात. तर बांगलादेशमधून ही प्रजात नामशेष झाली आहे. 20व्या दशकात अवास्ताव शिकार, वृक्षतोडीमुळे काळवीटांच्या संख्या वेगाने घटली. भारतात 1972 च्या वन्यजीव संरक्षण कायदा I अंतर्गत काळवीटाच्या शिकारीवर बंदी आहे.