आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीने श्रीशांतवर क्रिकेट खेळण्यासाठी आजीवन बंदी घातली होती.
दिल्ली पोलिसांनी श्रीशांतसह अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचा गुन्हा दाखल केला होता. मात्र दिल्ली न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. पण बीसीसीआयने घातलेली बंदी अद्याप कायम आहे. त्यामुळे त्याला बीसीसीआय संबंधित कोणत्याही क्रिकेटमध्ये खेळण्यास मनाई आहे, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं.
श्रीशांतने क्रिकेटनंतर राजकारण आणि सिनेमातही नशिब आजमावलं आहे. केरळ विधानसभेत त्याने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर अभिनेत्री रिचा चढ्ढासोबत त्याने 'कॅबरेट' या सिनेमात काम केलं होतं. पण या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही.
श्रीशांत हा राष्ट्रीय क्रिकेट खेळणारा केरळचा दुसराच खेळाडू आहे. त्याने 27 कसोटी सामने, आणि 53 वन डेमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. कसोटीमध्ये त्याच्या नावावर 87, तर वन डेत 75 विकेट आहेत. 10 टी-20 सामन्यांमध्ये त्याने 7 विकेट घेतल्या आहेत.