निकोबार बेटांमधली एक लोककथा आहे. साका नावाच्या, कुणाच्याच जाळ्यात न अडकणाऱ्या सुंदर पक्षिणीची.
साका माणसांच्या शिकारी वृत्तीने त्रासून गेली होती. शिकार सगळेच करतात, पण ती पोटापुरती असते. माणसाचं तसं नाही. त्याला साठवणुकीचा हव्यास असतो आणि त्यामुळे तो गरज नसतानाही शिकार करतो. त्याची भूक भागली तरी त्याची बुभुसित नजर पक्ष्यांची रंगीत पिसं आणि प्राण्यांची मऊ कातडी, शिंगं, दात, खूर अशा अनेक गोष्टींवर असते. कधी उपयुक्त वस्तू बनवायला, तर कधी निव्वळ सजावटीसाठी तो इतर जीवांना सहज मारतो. आपलं बेट माणसाच्या नजरेपासून दूर नेता आलं पाहिजे असं साकाला वाटलं. ती त्यासाठी सातत्याने सृष्टी देवतेची प्रार्थना करत राहिली.
अखेर सृष्टीदेवता प्रसन्न झाली आणि तिने साकाला शक्ती प्रदान केली. मात्र सूर्याचे किरण तिची शक्ती नष्ट करत जातील, त्यामुळे तिने आपलं काम एका रात्रीत पूर्ण करायचं होतं. तिच्याकडे अगदी कमी वेळ होता. तिनं बेटाचं एक टोक चोचीत पकडताच बेट एखाद्या पतंगासारखं हलकं झालं. ते घेऊन ती वेगाने आपल्या इच्छित स्थळाकडे निघाली.
बाकी सगळे पक्षी तिला साथ द्यायला तिच्यासोबत उडत होते. समुद्रातले सारे मासे लाटांवर नाचत तिच्याकडे नवलाने पाहात होते. साका थकली, तरीही उडत राहिली. पण सूर्याच्या पहिल्या किरणाने तिच्या भोवती जाळं विणायला सुरुवात केली. तिची शक्ती नाहीशी होऊ लागली. अखेर इच्छित स्थळाआधीच चावरा नावाच्या बेटाजवळ तिच्या चोचीतून तिचं बेट खाली पडलं आणि तिथंच स्थिरावलं.
निकोबार भागातल्या बेटांपैकी आजही सूर्याचं पाहिलं किरण साकाच्या बेटावर पडतं आणि साकाचे वंशज आजही सातत्याने सृष्टीदेवतेची प्रार्थना करतात. या बेटावर आजही माणसांनी अजून पाय ठेवलेला नाहीये. साकाचे वंशज सूर्यफुलांच्या बिया टणक चोचीने सहज फोडून आवडीने खातात. अनेक उपद्रवी तणांच्या बिया खात असल्याने शेतकऱ्यांना हे पक्षी उपयुक्त आणि म्हणून प्रियही वाटतात.
मधुर गाणारा, बुद्धिमान पक्षी ही साकाची आजचीही ओळख आहे. अर्थात कोकीळ पक्ष्यांमध्ये नर उत्तम गातो, तसंच साकाबाबतही म्हणतात. एका फिंच पक्ष्याने एका दिवसांत २,३०० वेळा गाणे म्हटल्याची नोंद अभ्यासकांकडे आहे.
साका म्हणजे ज्याला आपण गोल्डफिंच म्हणून ओळखतो तो, पॅसेरिफॉर्मिस गणातील फ्रिंजिलिडी कुलातील पक्षी. येशू ख्रिस्ताला क्रॉसवर खिळवले आणि डोक्यावर काटेरी मुकुट चढवला, तेव्हा ते काटे उपसून फेकणारा पक्षी म्हणून गोल्डफिंच गोष्टीतूनही परिचित आहेच. त्यावेळी त्याच्या तोंडावर रक्ताचे थेंब उडाल्याने त्याचा चेहरा लाल झाला आणि काटे त्याच्या आहाराचा भाग बनले अशी कथा आहे.
पुनरुत्थानाचं प्रतीक म्हणून तो ओळखला जातो. आजारी माणसाच्या अंथरुणाजवळ तो दिसला तर माणूस रोगमुक्त होतो अशी श्रद्धा आहे. लिओनार्दो दा विंची, राफाएल अशा अनेक प्रसिद्ध चित्रकारांनी गोल्ड फिंचला आपल्या चित्रांमध्ये स्थान दिलं आहे.
राफाएलचे पेंटिंग
गोल्डफिंच पाळीव पक्षी म्हणून लोकप्रिय होत गेला, कारण त्यांच्यात काही अंगभूत कौशल्यं होती. आपल्याकडे पोपट, मैना ‘बोलतात’ म्हणून पाळले जातात अनेकदा. गोल्डफिंचचे पाय, पायांची बोटं खास असतात आणि काही कामं तो या बोटांचा वापर करून करू शकतो. अगदी माणसं हातांची बोटं वापरतात तसंच म्हणा ना. पाळीव पक्ष्यांसाठी असलेल्या झाकण गोल्डफिंच आपलं आपण उघडून खाऊ शकतात वा लहानग्या बादलीत आपल्यापुरतं पाणी भरून आणू शकतात, हे पक्षी पाळणाऱ्या लोकांसाठी मोठंच आकर्षण!
Carel Fabritius (1622-54) या चित्रकाराने १६५४ साली केलेलं गोल्डफिंचचं पेंटिंग अशाच एका डब्यावर बसलेल्या स्थितीतलं आहे. पांढरी भिंत, भिंतीला डकवलेला डबा आणि गोल्डफिंच. यात ख्रिश्चन धर्मकल्पनांचा प्रभाव नसल्याने त्याचा चेहरा आवर्जून लाल दाखवण्याची चित्रकाराला वाटलेली नाहीये. ऐन तरुण वयात या चित्रकाराचा स्फोटात करुणास्पद मृत्यू झाला; पण त्याचे हे चित्र आजही चर्चेत राहिल्याने अमर बनलेले आहे असं म्हणायला हरकत नाही.
निकोबारमध्ये ‘बेट’ हे ‘महत्त्वाचं पात्र’ असलेल्या अनेक लोककथा आहेत. त्यातली मला सर्वात आवडलेली आहे ती तातोंरा आणि वामिरो यांची प्रेमकथा. कोणे एके काळी कारनिकोबार वेगळी बेटं नव्हती. ती एकत्र जोडली गेलेली सलग जमीन होती. विविध जमातींचे लोक तिथं नांदत होते. बलवान तातोंराकडे एक लाकडी तलवार होती आणि लोकांचा असा समज होता की लाकडी असली तरी त्या तलवारीत काहीतरी दैवी शक्ती आहे. तातोंरा त्याच्याच नव्हे तर आजूबाजूच्या गावांमध्येही त्याच्या कनवाळू वृत्तीमुळे, संकटात मदतीला धावून जाण्याच्या स्वभावामुळे आणि मृदुभाषक असल्यामुळे लोकप्रिय होता. एका संध्याकाळी वामिरोच्या मधुर गाण्याने त्याचं लक्ष वेधून घेतलं. वामिरोही त्याच्या प्रेमात पडली. दोघं चोरून भेटू लागले, पण वेगळ्या जमाती असल्याने आपले कुटुंबीय आपल्या लग्नाला होकार देणार नाहीत याची त्यांना कल्पना होती. तसंच झालं. एका सणाच्या दिवशी लोकांनी त्यांना चोरून भेटताना पाहिलं. वामिरो हमसून रडू लागली, तिचं रडू थांबेना. तिची आई तातोंराला शिव्याशाप देऊ लागली. दोघांच्या गावातले लोक एकमेकांसमोर येऊन भांडू लागले. अखेर तातोंरा संतापला आणि त्याने आपली तलवार उपसली. सगळे लोक स्तब्ध झाले. काहीतरी भयंकर घडणार हे जाणवून त्यांनी तातोंराला अडवण्याचा प्रयत्न केला. वारा थांबला. झाडं झुलायची थांबली. पक्ष्यांचा किलबिलाट मौन झाला. तातोंरानं पूर्ण शक्तिनिशी तलवार जमिनीत खुपसली. भूकंप व्हावा तसा जखमी गडगडाट ऐकू येऊ लागला. लोक भयभीत झाले. तलवार तशीच पुढे खेचत तातोंरा जमीन कापत निघाला. मोठी भेग पडू लागली. भेगेपलीकडून वामिरो त्याला थांबवण्यासाठी आक्रोश करत धावू लागली. पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं. बेटं पूर्ण विलग होऊन भेगेत पाणी भरलं तेव्हा तातोंरा भानावर आला. पण आता उशीर झाला होता. त्या दिवसानंतर ते प्रेमीजीव कुणाच्याच नजरेस पडले नाहीत. निकोबारचा दुसरा तुकडा आता तब्बल ९६ किमी अंतरावर लिटील अंदमान म्हणून ओळखला जातो. तिथं आता आंतरजातीय लग्नांना विरोध केला जात नाही.
‘घुमक्कडी’ ब्लॉग मालिकेतील याआधीचे सर्व ब्लॉग :
घुमक्कडी (२४) : कार निकोबार आणि नारळ
घुमक्कडी 23. लावण्याची देवता आणि प्रलय
घुमक्कडी (२१) : सतगुरु सिंवरो मोवण्या, जिण ओ संसार उपायो
घुमक्कडी (20): सात जिभांचा अग्नी आणि पुलोमाचे अश्रू
घुमक्कडी : (१९) : जे तुमच्याकडे नाही, ते माझ्याकडे आहे!
घुमक्कडी : (१८) : जिवंत होणारी चित्रं
घुमक्कडी : (१७) : कुरजां ऐ म्हारा भंवर मिला दीजो ऐ
घुमक्कडी (16) : निंदिया सतावे मोहे
घुमक्कडी (15) : बगळ्या बगळ्या कवडी दे
घुमक्कडी : (14) उडणाऱ्या देवदूतांचा महाल!
घुमक्कडी (13) : सांवरे अई जइय्यो जमुना किनारे
घुमक्कडी (12) : आईच्या आधी लेकीला न्हाण आलं हो…!
घुमक्कडी (11) : इज्जत जाईल, पण प्रियकर राहील!
घुमक्कडी (10) : तुमच्या हातात एक फूल दिलं, तर…
घुमक्कडी (9) : सासू-सुनांच्या विहिरी आणि तळी
घुमक्कडी (8) : फूल जंगल मे खिले किन के लिये
घुमक्कडी (7) : हुंकारकुपातले हरिण
घुमक्कडी (6) : वेगळ्या जागेवरून पाहताना
घुमक्कडी (5) : मिठाचा शुभ्र खारट खडा!
घुमक्कडी (4) साता प्रश्नांची कहाणी
घुमक्कडीः (3) न नींद नैना, ना अंग चैना
घुमक्कडी : (2) सीतेची तहान
घुमक्कडी : आभाळाचा कागद, समुद्राची शाई