टोलमुक्तीसाठी एसटी बसेसवर ‘ई-टॅग’
एबीपी माझा वेब टीम | 25 Jan 2017 09:36 AM (IST)
धुळे : टोल नाक्यांवर टोल भरण्यासाठी एसटी बसेसना लागणारा वेळ, त्यामुळे प्रवाशांनाही इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारा लेटमार्क आणि टोलचा आर्थिक ताळेबंद ठेवताना होत असलेला गोंधळ, या सर्वातून एसटी महामंडळाची लवकरच सुटका होणार आहे. एसटीच्या बसेसवर ई-टॅग प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एसटी बसेसवर ई-टॅग प्रणाली बसवल्यानंतर टोलची रक्कम थेट बँकेतूनच अदा केली जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, यामुळे 10 टक्के सूट टोलमधून एसटी बसेसना मिळेल. संपूर्ण राज्यात विस्तृत सेवा असलेल्या एसटीचा व्यापही मोठा आहे. जिल्हा मार्ग, राज्य मार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरून एसटी बसेस जाताना, त्यांना या मार्गावरील टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. यात सध्या राष्ट्रीय महामार्गांव्यतिरिक्त अन्य टोल नाक्यांतून एसटीच्या बसेसना सूट देण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील जवळपास 43 टोल नाक्यांतून एसटीच्या 3 हजार 500 हून अधिक बसेस जातात. तर काही महापालिका क्षेत्रातील टोल नाक्यांमधून एसटी जात असून, वर्षाकाठी 135 कोटी रुपये टोल महामंडळ भरत आहे. मुळात टोल भरताना एसटी बसेसचा वेळ जातो. त्यामुळे प्रवाशांनाही त्याचा मनस्ताप होतो. वाहक टोलची पावती गहाळ झाल्यास वाहकावरच ‘बिल’ फाडले जाते. त्याचप्रमाणे, टोलचा ताळेबंद ठेवतानाही एसटीच्या नाकेनऊ येतात. या सर्व कटकटीतून बाहेर पडण्यासाठी एसटी बसेसवर ‘ई-टॅग’बसवण्याचा निर्णय घेतला.