T20 World Cup : मागील काही दिवसांपासून भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. अशाच परिस्थितीत देशातील परिस्थितीवर पुन्हा एकदा लॉकडाऊनचे निर्बंध आले आहेत. असं असतानाही एकिकडे यंदाच्या आयपीएल स्पर्धा रद्द झालेल्या असतानाच बीसीसीआयकडून टी20 क्रिकेट विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात झाल्याचं कळत आहे. ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात भारत या स्पर्धेचं यजमानपद भूषवणार असल्याचं म्हटलं जात आहे. अशा परिस्थितीमध्ये स्पर्धेसाठी नियोजन करत रुपरेषा आखण्यासाठी म्हणून बीसीसीआयनं 29 मे रोजी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. 


कोरोनाची सद्यस्थिती पाहता या आयोजनावरही प्रश्नचिन्हं आहे. कारण, स्पर्धेचा दिवस उजाडेपर्यंत देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर दिसू शकतो. या स्पर्धेपूर्वी आयसीसीसुद्धा 1 जून रोजी एक महत्त्वाची बैठक घेत आहे. त्या बैठकीपूर्वीच बीसीसीआय काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करुन आयसीसीला कशा प्रकारे विश्वासात घेता येईल याची चर्चा करणार आहे. 


एएनआयच्या वृत्तानुसार या विषेश सर्वसाधारण बैठकीचा मुख्य हेतूच महत्त्वाच्या चर्चा करण्यावर केंद्रीत असणार आहे. बीसीसीआयशी संलग्न सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी 1 जूनला एक महत्त्वपूर्ण बैठक घेत आहे. त्याआधी म्हणजेच 29 मे रोजी आपण (बीसीसीआय)सुद्धा एक बैठक घेत आहोत. यामध्या कोविड परिस्थिती आणि टी20 विश्वचषकाला केंद्रस्थानी ठेवत कोणती पावलं उचलली जावीत यावर चर्चा केली जाईल. 


Corona Vaccination : लसीचा पहिला डोस घेत विराट सेना कोरोनाविरोधातील युद्धात एक पाऊल पुढे; इंग्लंडमध्ये घेणार दुसरा डोस


टी20 विश्वचषकाच्या यजमानपदाला केंद्रस्थानी ठेवत बीसीसीआयनं 9 ठिकाणांची निवड केली आहे. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, धरमशाला, लखनऊ यांचा समावेश असून, या राज्यांमध्ये स्पर्धेच्या पूर्ण तयारीवर भर द्यावा आणि तयारी पूर्ण करावी अशी विचारणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसंदर्भातील अंतिम निर्णय मात्र स्पर्धेची तारीख जवळ येताच कोविड परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर केला जाईल.