ढाका : भारताविरुद्ध आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत भिडण्यापूर्वी बांगलादेशच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्टर्सचा उच्छाद मांडला आहे. भारतीय तिरंग्याचा अवमान करणारे पोस्टर्स बांगलादेशी चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


चॅम्पियन्स ट्रॉफीत 15 जूनला भारत विरुद्ध बांगलादेश सेमीफायनल होणार आहे. त्याआधी बांगलादेशी चाहत्यांनी पुन्हा एकदा लायकी दाखवत आक्षेपार्ह पोस्टर्स शेअर केले आहेत.

आशिया कप दरम्यानही बांगलादेशी चाहत्यांनी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचे आक्षेपार्ह पोस्टर व्हायरल केले होते. मात्र टीम इंडियाने त्या सामन्यात बांगलादेशला पराभवाची धूळ चारुन पोस्टरला चोख उत्तर दिलं होतं.

मिरपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या त्याच प्रसंगाची पुनरावृत्ती बांगलादेशी चाहते करु इच्छित आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण बांगलादेशच्या या उच्छादाला टीम इंडियाने आपल्या कामगिरीने उत्तर दिलं होतं.

चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु होण्यापूर्वीच टीम इंडियाने सराव सामन्यात बांगलादेशला आपली जागा दाखवली होती. त्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा अख्खा संघ केवळ 84 धावात गुंडाळून 240 धावांनी विजय साजरा केला.

बांगलादेशची ही आयसीसी टूर्नामेंटच्या सेमीफायनलमध्ये जाण्याची पहिलीच वेळ आहे. टीम इंडियाने ब गटातून दोन विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली. तर बांगलादेशने एक विजय मिळवला आणि दुसरा संघ बाहेर गेल्याने सेमीफायनलचं स्वप्न पूर्ण झालं. ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सामन्यात पावसाने व्यत्यय आणला, ज्याचा फायदा बांगलादेशला झाला.

टीम इंडियाने बांगलादेशला गेल्या वर्षी दोन टी-20 सामन्यांमध्ये पराभवाची धूळ चारली आहे. तर वन डेमध्ये बांगलादेशविरुद्ध भारताने 82 टक्के सामने जिंकले आहेत.