मुंबई : मुंबईच्या अंधेरीमध्ये एका स्ट्रगलिंग मॉडेल आणि अभिनेत्रीची राहत्या घरी हत्या झाली. कृतिका चौधरी असं खून झालेल्या मॉडेलचं नाव आहे.
अंधेरीतल्या चार बंगला परिसरात असलेल्या भैरवनाथ सोसायटीतील घरात कुजलेल्या अवस्थेत कृतिकाचा मृतदेह सापडला. कृतिकाच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर या हत्येची घटना उघडकीस आली.
पोलिस घटनास्थळी पोहोचले असता घराचा दरवाजा बाहेरुन बंद होता. मृतदेहाच्या अवस्थेवरुन 3 ते 4 दिवसांपूर्वीच तिची हत्या झाली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी तिची मृतदेह बाहेर काढला असता, तिच्या डोक्यावर जखमा होत्या आणि पूर्णत: सडलेला होता.
दरम्यान, पोलिसांनी कृतिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. अंबोली पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतर पोलिस पुढील तपास करणार आहेत.
कृतिका मूळची हरिद्वारची असून ग्लॅमर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी ती मुंबईत आली होती. कृतिकाला पहिला ब्रेक 'परिचय' मालिकेतून मिळाला होता. याशिवाय कंगना राणावतच्या 'रज्जो' सिनेमातही ती दिसली होती.