Karim Benzema wins Ballon d’Or 2022 : जगप्रसिद्ध खेळ फुटबॉलमधील सर्वात मानाचा पुरस्कार म्हणजे 'बलॉन डी'ओर (Ballon d'Or Award) यंदा फ्रान्सचा स्टार खेळाडू आणि रिअल माद्रीद क्लबचा स्ट्रायकर करीम बेन्झिमा (Karim Benzema) याने मिळवला आहे. वर्षभरात सर्वोत्तम खेळ करणाऱ्या फुटबॉलपटूला दिला जाणारा हा प्रतिष्ठीत पुरस्कार यंदा बेन्झिमाला दिला असून यंदाच्या वर्षासाठी 30 खेळाडूंना नॉमिनेट करण्यात आलं होतं. ज्यामध्ये बेन्झीमाने बाजी मारली आहे. बेन्झिमाने चॅम्पियन्स लीगमध्ये कमाल कामगिरी केली. यंदाच्या वर्षी 46 सामन्यात त्याने 44 गोल केले आहेत.


विशेष म्हणजे गेली बरीच वर्षे फुटबॉल जगतावर राज्य करणाऱ्या मेस्सी, रोनाल़्डो अशा दिग्गजांना बेन्झिमाने मागं टाकलं असून रोनाल्डो यंदा 20 वा आला असून मेस्सीतर 30 खेळाडूंमध्ये नॉमिनेटही झाला नव्हता. दरम्यान बेन्झिमाने मिळवलेल्या या यशानंतर जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्याचा क्लब रिअल माद्रीदनेही त्याला बऱ्याच पोस्टमधून शुभेच्छा दिल्या आहेत. 






1998 नंतर पहिल्यांदाच फान्सच्या खेळाडूला मान


फुटबॉल जगतातील एक आघाडीचा देश असणाऱ्या फ्रान्सने 2018 चा फिफा विश्वचषकही पटकावला. त्यांच्याकडे कायमच स्टार खेळाडू असूनही बलॉन डी ओर हा मानाचा पुरस्कार गेली कित्येक वर्षे त्यांच्या खेळाडूला मिळाला नव्हता. फ्रान्सचा जादूगार फुटबॉ़लर जिदाने याने 1998 मध्ये हा पुरस्कार मिळवला होता, ज्यानंतर मात्र एकाही फ्रेंच खेळाडूला ही कमाल करता आली नाही. अखेर यंदाचा हा 2022 चा बलॉन डी ओर मिळवत बेन्झिमाने इतिहास रचला आहे.


टॉप 5 कोण?


1.करीम बेन्झिमा (रिअल माद्रीद)


2. सादिओ माने (लिव्हरपूल)


3. केविन डी ब्रुयन (मँचेस्टर सिटी)


4. रॉबर्ट लेवांडोव्स्की (बार्सिलोना/बायर्न म्युनिक)


5.मोहम्मद सालाह (लिव्हरपूल)


सर्वात मानाचा पुरस्कार Ballon d'Or  


Ballon d'Or अवॉर्ड फ्रान्समधील फुटबॉल मासिक 'बलॉन डी'ओरच्या वतीनं देण्यात येतो. क्लब आणि राष्ट्रीय संघातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1956 साली झाली, जेव्हा हा पुरस्कार स्टॅनले मॅथ्यूज यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तेव्हापासून हा अवॉर्ड दरवर्षी दिला जातो. तीन वर्षांपूर्वी म्हणजेच, 2018 पासून महिला फुटबॉलपटूंनाही हा पुरस्कार देण्यात येतो. 'बलॉन डी'ओर पुरस्कार वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूला दिला जातो. जगभरातील पत्रकार आणि चाहते या पुरस्कारासाठी त्यांच्या आवडत्या खेळाडूला मतदान करतात. या आधारावर विजेत्याची निवड केली जाते. हा पुरस्कार 1856 पासून दरवर्षी जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूला दिला जात आहे.