Todays Headline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.  

Continues below advertisement

बीसीसीआयला आज मिळणार 36 वा अध्यक्ष

बीसीसीआयची आज सर्वसाधारण सभा आणि निवडणूक होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध होणार असून रॉजर बिन्नी यांच्याकडे बीसीसीआयचं अध्यक्षपद येणार आहे. तर खजिनदारपदी आशिष शेलार यांची निवड होणार आहे.

बिल्किस बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 

बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांचा खून केल्याप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींना गुजरात सरकारने मुक्त केलं होतं. गुजरात सरकारच्या या निर्णयाविरोधात पीडित बिल्किस बानो हिने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. 

Continues below advertisement

अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुनावणी 

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आजपासून सीबीआय कोर्टात सुनावणील होणार आहे. सीबीआयच्या गुन्ह्यावरूनच ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात हायकोर्टान देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ईडीला कोणताही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयानं त्यांचं अपील फेटाळून लावलं आहे. त्यामुळे देशमुखांनी सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मागत कोर्टात याचिका दाखल केली आहे. 

संजय राऊत यांच्या याचिकेवर सुनावणी  

पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेल्या संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी सुरू राहणार आहे. राऊत यांच्या जामिनाला ईडीने विरोध केला आहे. आज संजय राऊतांच्या वकिलांकडून बाजू मांडली जाणार आहे.

उमर खालिदच्या जामीन याचिकेवर सुनावणी 

जेएनयूचा विद्यार्थी उमर खालीद याच्या जामीन याचिकेवर आज दिल्ली उच्च न्यायायलयात आज सुनावणी होणार आहे. 2020 साली दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. तसेच देशविरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर यूएपीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनी त्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.