मकाऊ : भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवालनं मकाऊ ओपनच्या दुसऱ्या फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीच्या सलामीच्या सामन्यात सायनानं इंडोनेशियाच्या हाना रमादिनीवर 21-23, 21-14, 21-18 असा संघर्षमय विजय मिळवला.

सायनानं हाना रमादिनीचा संघर्ष एक तास आणि तीन मिनिटांत मोडून काढला. या सामन्यात हाना रमादिनीनं पहिला गेम जिंकून सायनाला बॅकफूटवर धाडलं. मात्र सायनानं जबरदस्त कमबॅक करुन पुढचे दोन्ही गेम्स आपल्या नावावर केले.

मकाऊ ओपनसाठी सायना नेहवालला अव्वल मानांकन देण्यात आलं आहे. दुसऱ्या फेरीत सायनासमोर  इंडोनेशियाच्याच दिनार धाय आयुस्तिनचं आव्हान असेल.

दुसरीकडे भारताच्या पारुपल्ली कश्यपनं चीन तैपेईच्या चुन वेई चेनचा 21-19, 21-8 असा पराभव करुन मकाऊ ओपनच्या उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. कश्यप गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीनं त्रस्त होता. पण चुन वेई चेनवर मिळवलेल्या विजयानं तो दुखापतीतून सावरल्याचं दाखवून दिलं.

आता कश्यपला पुढच्या सामन्यात चीन तैपैईच्याच लीन यू हसईनचा सामना करायचा आहे. हाँगकाँग ओपन सुपर सीरीजची फायनल गाठणाऱ्या समीर वर्मानं मात्र मकाऊ ओपनमध्ये निराशा केली आहे. इंडोनेशियाच्या मोहम्मद बायू पंगिस्तूनं समीर वर्मावर 21-18, 21-13 अशी मात केली.