मुंबई : मुंबईच्या वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहाबाहेर संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. अनधिकृत बॅनर हटवण्यावरुन त्यांच्यात वाद झाला.
संभाजी ब्रिगेडचा आज पक्ष स्थापना दिवस आहे. त्याच्यानिमित्ताने रंगशारदा हॉलमध्ये कार्याक्रम आहे. मात्र कार्यक्रमापूर्वी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हॉलच्या आजूबाजूच्या परिसरात बॅनर्स लावले.
परंतु हे बॅनर्स अनधिकृत असल्याचं सांगत महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ते हटवण्यास सुरुवात केली. मात्र संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांना रोखलं. त्यानंतर कार्यकर्ते आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला.
महापालिका कर्मचारी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांविरोधात वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करत आहे. तसंच पोलिसांच्या मदतीने पालिका कर्मचाऱ्यांकडून हे बॅनर हटवले जात आहेत.