डेहरादून - स्पर्धा परीक्षेतच सर्वात मोठी स्पर्धा सुरु झाली आहे.मात्र, एमपीएससी आणि युपीएससी परीक्षेतही ग्रामीण भागाचा टक्का वाढला आहे. महाराष्ट्रातील भूमीपुत्रांनीही गेल्या काही वर्षात युपीएससी परीक्षेत दमदार कामगिरी केल्याचं पाहायला मिळत आहे. यंदाही मराठमोळ्या उमेदवारांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपला झेंडा रोवला आहे. महाराष्ट्रातून अनिकेत हिरडे अव्वल आला असून त्याने देशात 81 वी रँक मिळवली आहे. स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं लाखो उमेदवारांचं आणि त्यांच्या पालकांचं स्वप्न असतं. त्यामध्ये, काहींना यश मिळते, तर अनेकांना अपयश. त्यामुळेच यास स्पर्धा परीक्षा म्हणत असावेत. यंदाच्या युपीएससी परीक्षेत एका बॅडमिंटनपटूनेही यशाला गवसणी घातली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएसई मेन्स परीक्षा 2023 चा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आला आहे. यंदा युपीएससी परीक्षेमध्ये टॉप रँकमध्ये मुलांचं वर्चस्व दिसून आलं. युपीएससी सीएसई मेन्स परीक्षा 2023 मध्ये 1016 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये, उत्तराखडंचे माजी डीजीपी अशोक कुमार यांची कन्या कुहू गर्ग हिनेही यश संपादन केले. कुहूने देशात 178 वी रँक मिळवून वडिलांचे स्वप्न साकार केले. आपल्या लेकीनेही अधिकारी व्हावे, असे सनदी अधिकारी राहिलेल्या वडिलांचे स्वप्न होते. कुहूने आपली बॅडमिंटन खेळाची आवड जपत हे स्वप्न पूर्ण केले. दुर्दैवाने दुखापतग्रस्त झाल्यामुळे तिला खेळ सोडावा लागला होता. मात्र, त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेतून अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण केलं.
बॅडमिंटनपटूची आंतरराष्ट्रीय चमकदारी
बॅडमिंटन खेळात कुहूने देशात नाव कमावलं आहे. तिने आजपर्यंत 56 ऑल इंडिया मेडल्स आणि 18 इंटरनॅशनल मेडल्स कुहूच्या नावावर आहेत. मिश्र दुहेरीत कुहूची टॉप आंतरराष्ट्रीय रँक ३४ असून देशात मिश्र दुहेरी रँकींगमध्ये ती दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॅडमिंटन खेळानेच मला कष्ट आणि शिस्तपालनाची सवय लावली. त्यामुळे, युपीएससी परीक्षेत मला त्याचा मोठा फायदा झाला, असे कुहूने म्हटले आहे. मात्र, स्पर्धा परीक्षेतील आपल्या यशाचे श्रेय तिने वडिलांना दिले. डेहरादूनच्या सेंट जोफेस इंग्लिश मीडियम स्कुलमधून तिने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर, राजधानी दिल्ली येथील एसआरसीसी महाविद्यालयातून आपली पदवी पूर्ण केली. स्पर्धा परीक्षेसाठी आपण 16-16 तास अभ्यास केल्याचं तिने सांगितले.
क्रिकेटसंदर्भात विचारला प्रश्न
कुहूला मुलाखतीदरम्यान क्रिकेटच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्यात आला होता. क्रिकेटमुळे इतर खेळ खराब झाले आहेत. क्रिकेटला इंडस्ट्रीज बनवलं आहे का, असा प्रश्न कुहूला विचारला गेला होता. त्यावर, अजिबात नाही क्रिकेटचा परिणाम कुठल्याही खेळावर होताना दिसून येत नाही. याउलट देशातील क्रिकेट मोठं होत असून इतरही खेळ अधिक मोठे होऊ शकतात, असे उत्तर कुहून दिले होते.
महाराष्ट्राचाही दबदबा कायम
दरम्यान महाराष्ट्रातून अनिकेत हिरडे, प्रियंका सुरेश मोहीते, अर्चित डोंगरे हे उत्तीर्ण झाले असून अनिकेत हिरडे याने 81 वा रॅंक, प्रियंका सुरेश मोहिते या विद्यार्थीनीने 595 वा रॅंक आणि अर्चित डोंगरे या विद्यार्थ्याने 153 वा रॅंक मिळवून गगनभरारी घेतली.