मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार (Virat Kohli) विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) , त्यांच्या बाळाच्या आगमनासाठी अत्यंत उत्सुक आहेत. एकिकडे अनुष्का सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या गरोदरपणातील प्रवास सर्वांच्या भेटीला आणत आहे. तर, दुसरीकडे विराट भारतीय क्रिकेट संघातील त्याची जबाबदारी पार पाडत आहे. इतकंच नव्हे, तर ऑस्ट्रेलियाच्या संघाविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यानंतर तो मायदेशी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेवर भारतीय संघाची धुरा असेल.


तिथं विराट संघाला सोडून मायदेशी परतायला निघालेला असतानाच आता त्यांच्या बाळाचाच जन्म थेट ऑस्ट्रेलियातच होण्यासंबंधीचा प्रस्ताव या सेलिब्रिटी जोडीसमोर ठेवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघातील माजी क्रिकेटपटू ब्रेट ली यानं ही ऑफर 'विरुष्का'ला दिली आहे.


ऑस्ट्रेलियाच्या भूमित अनुष्कानं तिच्या बाळाला जन्म द्यावं, यासाठी ब्रेट लीनं त्यांना आमंत्रित केलं आहे. 'मिड- डे' या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यानं यासंबंधीचं वक्तव्य केल्याचं म्हटलं जात आहे. विराटची इच्छा असेल तर, त्याच्या बाळाचं ऑस्ट्रेलियात स्वागतच आहे. ऑस्ट्रेलियातील नागरिक त्याचा आनंदानं स्वीकार करतील, असं तो म्हणाला.

'तुला मुलगा झाला तरीही आनंद आणि मुलगी झाली तरीही उत्तम', असं म्हणत ब्रेट लीनं अनोख्या अंदाजात 'विरुष्का'पुढं ही ऑफर ठेवली. तेव्हा आता ऑस्ट्रेलियाच्या या लोकप्रिय खेळाडूच्या ऑफरवर विराट आणि अनुष्का काय उत्तर देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.


दरम्यान, काही महिन्यांपूर्वीच अनुष्का आणि विराटनं सोशल मीडियाच्या आधारे त्यांच्या जीवनात येणाऱ्या या नव्या पाहुण्याची माहिती सर्वांनाच दिली होती. ज्यानंतर या जोडीवर अमाप शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.


विराट या परिस्थितीमध्ये वेळोवेळी शक्य त्या सर्व परिंनी अनुष्काची साथ देताना दिसत आहे. आयपीएल सामन्यांच्या वेळीसुद्धा अनुष्का आणि विराटला एकत्र पाहायला मिळालं होतं. प्रत्यक्ष पत्नीसमवेत राहता येत नाही अशा वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही ही जोडी एकमेकांच्या संपर्कात असून चाहत्यांना खऱ्या अर्थानं #CoupleGoals देत आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही.