मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने माजी संचालक रवी शास्त्री चांगलेच दु:खी असल्याचं दिसतंय. कारण इंग्रजी वृत्तपत्र टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रवी शास्त्रींची नाराजी स्पष्ट दिसून आली.
सौरवा गांगुलीला माझा काय प्रॉब्लेम आहे, असा सवाल रवी शास्त्री यांनी विचारला. तसंच मुलाखत देणं हे माझं काम होतं, मात्र पडद्यामागे काय चाललं होतं, हे मला माहित नाही, असंही रवी शास्त्री एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
नुकतीच टीम इंडियाच्य प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेंची निवड झाली आहे. मात्र या शर्यतीत सुरुवातीपासूनच रवी शास्त्रींचं नाव आघाडीवर होतं. मात्र ऐनवेळी अनिल कुंबळेंची एण्ट्री झाली आणि शास्त्री मागे पडले.
प्रशिक्षकपदी निवड न झाल्याने मला प्रचंड दु:ख झालं. मात्र आता या गोष्टीला आठवडा उलटला आहे. त्यामुळे आता काही फरक पडत नाही. प्रशिक्षक कोण असावा? याबाबतचा निर्णय बोर्ड घेतं. कोणाला प्रशिक्षकपदाची जबाबदारी द्यावी, हा त्यांचा निर्णय आहे, असंही शास्त्रींनी नमूद केलं.
शास्त्रींच्या मुलाखतीतील काही भाग
अनिल कुंबळेची निवड पूर्वनियोजित होती?
या प्रश्नाचं उत्तर देणं माझं काम नाही. मी टीम इंडियाचा डायरेक्टर होतो, तेव्हा संघ बांधणं माझं काम होतं. ते काम मी प्रामाणिकपणे, पूर्ण क्षमतेने केलं. भारतीस संघ आज प्रत्येक फॉर्मेटमध्ये जगातील पहिल्या दोन संघात आहे.
मुलाखत प्रक्रिया पारदर्शी होती?
मुलाखत देणं हे माझं काम होतं, ते मी केलं. आतमध्ये काय सुरु होतं, हे मला माहित नाही.
तुझ्या मुलाखतीदरम्यान सौरव गांगुली बाहेर का गेला?
मी सांगितल्याप्रमाणे माझ्या मुलाखतीवेळी सौरव गांगुली उपस्थित नव्हता. मात्र गांगुलीला माझा काय प्रॉब्लेम आहे, हे मला विचारण्याऐवजी त्यालाच विचारा
मुलाखत कोणत्या मुद्द्यांवर आधारित होती?
मी काही सीईओच्या जॉबसाठी मुलाखत देत नव्हतो. त्यामुळे क्रिकेट आणि टीम इंडियाच्या भवितव्याबाबत माझी सचिन तेंडुलकर, संजय जगदाळे आणि व्हीव्हीएस लक्ष्मणसोबत चांगली चर्चा झाली. माझ्या कार्यकाळात संघाची कामगिरीबाबतही बोलणं झालं. महत्त्वाचं म्हणजे खेळाडू यशासाठी भुकेले आहेत. आपण सध्या कसोटीत अव्वल स्थानी नाही, याचं कारण म्हणजे आपण गेल्या सहा महिन्यांपासून कसोटी खेळलीच नाही.
धोनीच्या कर्णधारपदाबाबत तुमचं म्हणणं काय?
धोनी हा सध्याचा ग्रेटेस्ट क्रिकेटर आहे. तो ज्याप्रकारे धावा करतो, त्यामुळे तो संघातील उत्तम खेळाडू आहे. मला वाटतं त्याच्याकडे अजून तीन ते चार वर्ष क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे. मात्र एखादा खेळाडू सर्व फॉर्मेटमध्ये क्रिकेट खेळत असेल, जसे की विराट कोहली, तर त्याच्याकडे आपण कर्णधार म्हणून पाहायला हवं. पण तो निर्णय निवड समितीचा आहे. पण मला वाटतं धोनीला कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्यास तो सचिन, द्रविडप्रमाणे आणखी मोकळा होईल. तसंच तो कोणत्याही विशेषता कर्णधारपदाच्या दबावात खेळणार नाही.
वेस्ट इंडिज दौऱ्यावर समालोचक/कॉमेंटेटर म्हणून जाणार?
समालोचक म्हणून नाही. जुलैच्या अखेर मी वेस्ट इंडिजमध्ये असेन. पण गॅरी सोबर्स यांच्या 80 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी जाणार आहे.