मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांच्या पोस्टरच्या कल्पना या हॉलिवूड किंवा इतर परभाषिक चित्रपटांच्या पोस्टरवरुन चोरल्याचं ऐकायला मिळतं. आता मात्र बॉलिवूडच्या पोस्टरची संकल्पना सुपरस्टार रजनीकांतच्या सिनेमासाठी वापरल्याचं म्हटलं जात आहे.
रजनीकांतच्या 'कबाली' चित्रपटाचं पोस्टर इरफान खानच्या आगामी 'मदारी' चित्रपटावरुन ढापल्याचं खुद्द इरफाननेच म्हटलं आहे. मात्र यावर आपली काहीच हरकत नसून चाहत्यांनी दोन्ही सिनेमा पाहावेत, असं आवाहनही इरफानने केलं आहे.
'मला आधी याबाबत काहीच कल्पना नव्हती. आम्ही तर छोटेसे फिल्ममेकर आहोत. पण सुपरस्टार रजनी यांच्या कबाली चित्रपटाचं पोस्टर आमच्या मदारी सिनेमाच्या पोस्टरवरुन प्रेरित असल्याचं मी पाहिलं. आता तुम्हीच दोन्ही पोस्टर पाहा ना. पण त्यात काय झालं. तुम्ही आमचाही सिनेमा पाहा आणि त्याचाही सिनेमा पाहा.' असं इरफानने प्रांजळपणे म्हटलं आहे.
दोन्ही चित्रपटाच्या पोस्टरमध्ये मुख्य नायकाचा चेहरा दिसत आहे. तर टोलेजंग इमारती त्यांच्या चेहऱ्यावर आडव्या आहेत. मदारी चित्रपटाचं पोस्टर अधिकृत असून, कबालीचं मात्र फॅन्सनी तयार केलेलं असल्याचं म्हटलं जातंय. कबालीची असंख्य पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत.
रजनीकांतने कबाली चित्रपटाचं शूटिंग सुरु झाल्यानंतर दोन पोस्टर शेअर केली होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात रजनीने ट्विटरवर ही पोस्टर्स पोस्ट केली होती.