Asian Games 2023 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या मराठमोळा ओजस देवतळे आणि ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कंपाऊंड आर्चरी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून दिलं. ओजस देवतळे आणि ज्योतीच्या जोडीने तिरंदाजी मिश्र स्पर्धेत भारताला 16 वं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये आज अकराव्या दिवशी भारताच्य खात्यात आणखी एक पदक वाढलं आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 71 पदकं जमा झाली आहेत.
भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम आणि प्रवीण ओजस देवतळे यांनी दक्षिण कोरियाच्या चावोन सो आणि जाहून जू यांच्यावर एक गुणांची आघाडी कायम ठेवली आणि भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. भारताच्या ज्योती आणि ओजस या जोडीने दक्षिण कोरियाच्या जोडीचा 159-158 पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. आशियाई स्पर्धा 2023 मध्ये हे भारताला मिळालेले सोळावं सुवर्ण पदक आहे.
आशियाई स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी
यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतानं आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. तिरंदाजीमध्ये पटकावलेल्या या सुवर्ण पदकासह भारताने जिंकलेल्या पदकांची संख्या 71 वर पोहोचली आहे. यामध्ये 16 सुवर्णपदकं, 26 रौप्यपदकं आणि 29 कांस्यपदकांचा समावेश आहे.
आणखी एक सुवर्ण आणि रौप्य निश्चित
भारताच्या तिरंदाजांनी आणखी दोन पदकं निश्चित केली आहेत. सुवर्णपदाकासाठी दोन भारतीय खेळाडूंमध्ये लढत होणार आहे. यामध्येही नागपूरच्या मराठमोळ्याओजस देवतळ याचा समावेश आहे. मंगळवारी ओजसने मंगळवारी पुरुष एकल कम्पाऊंड आर्चरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यासोबतच अभिषेक वर्मा यानेही पुरुष एकल कम्पाऊंड आर्चरी अंतिम फेरी गाठली आहे. आता कम्पाऊंड आर्चरीच्या फायनलमधे अभिषेक वर्मा आणि ओजस देवतळे यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. सुवर्णपदक कोण जिंकणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. पण, भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्णपदक आणि एक रौप्यपदक जमा होणार हे मात्र निश्चित झालं आहे.
बॅडमिंटनमध्ये भारताचा प्रणॉय उपांत्यपूर्व फेरीत
भारताचा प्रणॉय बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. प्रणॉयने कझाकिस्तानच्या दिमित्री पनारिनचा (21-12, 21-13) पराभव करून बॅडमिंटन पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
कॅनोई क्रीडा प्रकारात भारताला कांस्य पदक
भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनिल सिंह यांनी पुरूष दुहेरी 1000 मीटर कॅनोई क्रीडा प्रकारात भारताला कांस्य पदक पटकावून दिले. या जोडीने 3.53.329 वेळ नोंदवत पदकावर कब्जा केला.