ऑस्ट्रेलियातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर भारतीय खेळाडू आता सज्ज. इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात 18 व्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तातल्या गेलोरा बन्ग कार्नो स्टेडियमवर आज संध्याकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतल्या घवघवीत यशानंतर एशियाडमध्येही भारतीय शिलेदारांकडून त्याच कामगिरीची अपेक्षा केली जातेय.


45 देश... 36 खेळ... 572 खेळाडू... आणि लक्ष्य एकच....एशियाडचं पदक.

इंडोनेशियातल्या जकार्ता आणि पालेमबांग शहरात आयोजित अठराव्या एशियाडसाठी भारताचं 572 खेळाडूंचं पथक सज्ज झालंय. ऑस्ट्रेलियात नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदकांची लूट केली. त्यानंतर आता एशियाडमध्येही भारतीय पथकाकडून पदकांची मोठी अपेक्षा आहे.

एशियाड म्हणजे आशियाई देशांसाठीचा सर्वोच्च क्रीडामेळा. ऑलिम्पिकच्या धर्तीवर दर चार वर्षांनी आशियाई देशांसाठी होणारा बहुविध खेळांचा महोत्सव म्हणजे एशियाड. आशियाई ऑलिम्पिक समितीच्या वतीनं एशियाडचं आयोजन करण्यात येतं. आशिया खंडातल्या तब्बल 45 देशांचा एशियाडमध्ये सहभाग असतो. ऑलिम्पिकपाठोपाठ जगातली दुसऱ्या क्रमांकाची मोठी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अशी एशियाडची ओळख आहे.

इंडोनेशियाच्या जकार्ता आणि पालेमबान्ग शहरांमध्ये यंदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं आहे. जकार्तात होणारं हे आजवरचं दुसरं एशियाड आहे. याआधी 1962 साली जकार्तामध्ये एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. यंदा जकार्तासह पालेमबान्ग शहरातही एशियाडच्या काही क्रीडाप्रकारांचं आयोजन करण्यात येईल. इंडोनेशियातल्या अठराव्या एशियाडमध्ये 58 क्रीडाप्रकारांत मिळून एकूण 465 पदकं पणाला लागलेली असतील. त्यासाठी 45 देशांमधले हजारो खेळाडू आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सिद्ध झाले आहेत.

आपला भारत आणि एशियाडचं भावनिक नातं आहे. भारतानं आजवर दोनवेळा एशियाडचं यशस्वी आयोजन केलं आहे. 1951 साली म्हणजेच देश स्वतंत्र झाल्यानंतर अवघ्या चार वर्षांत भारतात पहिल्या एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंच्या प्रयत्नामुळं नवी दिल्लीत एशियाडचा हा मेळा संपन्न झाला होता. आशियाई देशांमधील सलोखा वाढीस लागावा आणि या देशांमध्ये दृढतेची भावना निर्माण व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. पुढे 1982 साली इंदिरा गांधी पंतप्रधान असताना नवी दिल्लीत दुसऱ्यांदा एशियाडचं आयोजन करण्यात आलं होतं.

1982 सालच्या एशियाडमध्ये भारताला 13 सुवर्णपदकांसह पदकतालिकेत पाचवं स्थान मिळालं होतं. त्या एशियाडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बोधचिन्ह अप्पू. आज ४५ ते ५० वयोगटातल्या भारतीयांच्या मनात तो अप्पू आजही घर करुन आहे.

एशियाडच्या आजवरच्या इतिहासात भारतानं 616 पदकांची कमाई केली आहे. त्यात 139 सुवर्ण, 178 रौप्य आणि 299 कांस्यपदकांचा समावेश आहे. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये भारताला 11 सुवर्ण, नऊ रौप्य आणि ३७ कांस्यपदकांसह आठव्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. गत एशियाडमधली 57 पदकांची ती कमाई यंदा आणखी वाढवण्याचा भारतीय खेळाडूंचा प्रयत्न राहील.

ऑस्ट्रेलियातल्या गोल्ड कोस्टमध्ये आयोजित कॉमनवेल्थ गेम्स ही भारतीय खेळाडूंची एशियाडआधीची पूर्वपरीक्षा होती. त्या परीक्षेत भारतीय शिलेदारांनी घवघवीत यश मिळवलं. भारताचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतलं ते यश एशियाडमध्ये परावर्तित होतं का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.