तिरुअनंतपुरम : महापुरामुळे केरळमध्ये हाह:कार माजला असून, त्यात आतापर्यंत 324 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 लाखांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. हवामान विभागाने केरळमधील 13 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जाहीर केला आहे.

भीषण पुरात आतापर्यंत 324 जणांचा मृत्यू

केरळमध्ये आतापर्यंत 324 जणांनी आपले प्राण गमावले आहेत, तर 80 धरणांचे दरवाजे उघडले असून 22 लाख 31 हजार 139 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. 1500 कॅम्पमध्ये या नागरिकांना ठेवण्यात आलं आहे. केरळ सरकारला मदत करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.



आतापर्यंत साडेआठ हजार कोटींचंं नुकसान

केरळला आतापर्यंत साडे आठ हजार कोटींचं नुकसान झालं आहे. वीज, रस्ते आणि सर्व जनजीवन विस्कळीत झालं असून पदार्थांचीही सध्या उणीव आहे. केरळच्या मदतीसाठी देशातली सर्व राज्य एकवटली आहेत. दिल्ली, पंजाब, तेलंगणा या राज्यांनी आर्थिक मदत दिली आहे. तर भारतीय रेल्वेकडून आवश्यक वस्तूंचा पुरवठा केला जात आहे.



देशातील इतर राज्यांकडून मदतीचा हात

गेल्या 100 वर्षांतील सर्वात भीषण महापुराचा सामना करणाऱ्या केरळला देशातील इतर राज्यांमधून मदतीचा ओघ सुरु झाला आहे. दिल्ली सरकारने 10 कोटी, तेलंगणा, 25 कोटी, आंध्र प्रदेश 10 कोटी आणि पंजाब सरकारने केरळला 10 कोटींचं अर्थसहाय्य जाहीर केलं असून तातडीने ही रक्कम देण्यात येणार आहे. शिवाय केंद्र सरकारने याआधीच शंभर कोटी दिले असून लागेल तेवढी मदत देण्याचं आश्वासन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिलं आहे.



गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या सहाय्याने वाचवलं!

राष्ट्रीय बचाव पथकांसोबत भारतीय नौदलाचे शेकडो जवान पूरग्रस्त भागात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे काम करत आहेत. याच बचावकार्यातील एक व्हिडीओ नेव्हीने ट्विट केला आहे. त्यामध्ये त्यांनी एका गर्भवती महिलेला हेलिकॉप्टरच्या साह्याने वाचवले आहे. या व्हिडीओमध्ये महिलेला दोरीच्या साहाय्याने पुराच्या भागातून हेलिकॉप्टरमध्ये ओढण्यात आले आहे. या  महिलेला जवळील संजीवनी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. वेळीच डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करत ऑपरेशन केले. यानंतर महिलेनं बाळाला जन्म दिला.



पंतप्रधान मोदी केरळमध्ये दाखल

दरम्यान, केरळातील या भीषण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी काल रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तिरुअनंतपुरम विमानतळावर दाखल झाले. केरळचे मुख्यमंत्री, राज्यपाल आणि केंद्रीय मंत्र्यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. मोदींकडून पूरस्थितीचा आढावा घेण्यात येणार असून लवकरच मोठी मदतही जाहीर होऊ शकते.