जकार्ता : एशियाडमधील महिलांच्या 400 मीटर रिलेत भारतानं सुवर्णपदकाची कमाई केली. भारताच्या महिला धावपटूंनी एशियाडच्या इतिहासात रिलेत मिळवलेलं हे सलग पाचवं सुवर्णपदक ठरलं. भारतीय चमूनं तीन मिनिटं आणि 28.72 सेकंदात शर्यत पार करून सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.


भारताच्या सुवर्णपदक विजेत्या चमूत हिमा दास, एम. आर. पुवाम्मा, सरिताबेन गायकवाड आणि विस्मया कोरोथ या धावपटूंचा समावेश होता. महिलांच्या या रिलेमध्ये बहारिन आणि व्हिएतनामनं अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक पटकावलं. भारतानं 2002 सालच्या बुसान एशियाडपासून महिलांच्या 400 मीटर रिलेत आजवर सुवर्णपदकाची परंपरा कायम राखली आहे.


याआधी आज भारताचा जिन्सन जॉन्सन हा पुरुषांच्या 1500 मीटर शर्यतीत एशियाड सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे. इंडोनेशियातल्या एशियाडमध्ये त्याचं हे दुसरं पदक ठरलं.


भारताच्या खात्यात आज पाच पदकं
एशियाडच्या बाराव्या दिवशी भारताच्या खजिन्यात दोन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी पाच पदकांची भर पडली. पुरुषांच्या 400 मीटर रिलेत भारतीय धावपटूंना रौप्यपदकावर समाधान मानावं लागलं. रौप्यविजेत्या भारतीय संघानं या रिलेत तीन मिनिटं आणि 1.85 सेकंद वेळेची नोंद केली.


आशियाई विजेत्या पी. यू. चित्रानं एशियाडमध्ये भारताला 1500 मीटर्स शर्यतीचं कांस्यपदक पटकावून दिलं. भारताच्या गतविजेत्या सीमा पुनियाला महिलांच्या थाळीफेकीत कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.


गतविजेत्या भारताला एशियाडमधील पुरुषांच्या हॉकीत उपांत्य फेरीतच हार स्वीकारण्याची वेळ आली. मलेशियानं या सामन्यात भारताचा सडन डेथमध्ये 6-7 असा पराभव केला. या पराभवामुळे 2020 सालच्या टोकियो ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरण्याची भारताची संधी हुकली.


भारत आठव्या स्थानावर
एशियाडच्या पदक तालिकेत भारत सध्या आठव्या स्थानावर आहे. भारताच्या खात्यात आतापर्यंत 13 सुवर्ण पदक, 20 रौप्य पदक, 25 कांस्य पदक आहेत. तर 111 सुवर्ण पदकांसह 239 पदकांची कमाई करणारा चीन या यादीत अव्वल स्थानी आहे.