भुवनेश्वर : 22व्या एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत भारताचं एक सुवर्ण पदक कमी झालं. मूळची अकोल्याच्या तेल्हारातील असलेली धावपटू अर्चना आढावचं सुवर्ण पदक काढून घेण्यात आलं.

22 वर्षीय अर्चनाने 2 मिनिट 2 सेकंदात 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकलं. मात्र श्रीलंकेच्या निमाली कोंडाने अर्चनाच्या सुवर्ण पदकला विरोध केला. फिनिश लाईनवर अर्चना आढावने मागून धक्का दिल्याचा आरोप निमाली कोंडाने केला.

त्यानंतर आयोजकांनी अर्चनाला अयोग्य घोषित करुन 2 मिनिट 05:23 सेकंदात शर्यत पूर्ण करणाऱ्या श्रीलंकेच्या निलामीला सुवर्णपदक दिलं.

श्रीलंकेची आणखी एक अॅथलिट गायंतिका तुषारीने (2:05:27) रौप्य आणि जपानच्या फुमिका ओमोरीने कांस्यपदकाची कमाई केली.

दरम्यान, एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 12 कास्य पदकांसह एकूण 28 पदकांची कमाई केली. काल (रविवार) अखेरच्या दिवशी नीरज चोप्रा, राजा गोविंदन आणि स्वप्ना बर्मनने सुवर्ण पदक जिंकलं.

भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियममध्ये रविवारी (9 जुलै) एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेची सांगता झाली.