Virendra Sehwag On Virat Kohli : भारतीय संघाने आशिया कप 2022 स्पर्धेत (Asia Cup 2022) विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. रविवारी पाकिस्तानला भारताने 5 विकेट्सने मात दिल्यानंतर भारतीय संघाचं देशभर कौतुक होत आहे. या सामन्यात भारतीयांचच नाही तर क्रिकेट जगताचं लक्ष विराट कोहली कडे होतं. दरम्यान कोहलीने देखील सामन्यात 35 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. विराट कोहलीच्या या खेळीनंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने त्याच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.


सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ 19.5 षटकांत 147 धावांवर गारद झाला. भारतीय संघाने 19.4 षटकांत 5 गडी गमावून 148 धावा करून सामना 5 विकेट्सनी जिंकला. यावेळी भारताची सुरुवात खराब झाली असताना विराटने संयमी खेळी दाखवत 34 चेंडूत 35 धावा केल्या. तो संघाला विजयापर्यंत घेऊन जाऊ शकला नसला तरी त्याने महत्त्वाच्या वेळी संघाचा डाव सावरला. त्यामुळे माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने विराट त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतत आहे, असं मोठं वक्तव्य केलं आहे. तो म्हणाला पुढील काही सामन्यांत विराट नक्कीच आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतेल. विराटनं 34 चेंडूत 35 धावांची खेळी केली, त्याने 3 चौकार आणि  1 षटकार यावेळी लगावला. तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जाडेजा यांनी अप्रतिम फिनीशिंग करत संघाला विजय मिळवून दिला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पुन्हा आधीच्या विराट कोहलीची झलक दिसल्याचे वीरेंद्र सेहवागने सांगितले. 'मला वाटते की त्याला त्याचा फॉर्म पूर्णपणे परत येण्यासाठी थोडा वेळ लागेल.' असंही सेहवाग म्हणाला.


विराटनं रौफला भेट दिली जर्सी


दुबईत खेळल्या गेलेल्या या सामन्यानंतर विराटने पाकिस्तानचा गोलंदाज हारिस रौफशी संवाद साधला आणि सोबतच त्याला स्वत:ची सही असणारी जर्सीही भेट दिली. दरम्यान दोघांच्या या भेटीयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बीसीसीआयने या दोघांच्या भेटीचा एक व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये कोहली आणि रौफ एकमेंकाशी संवाद साधताना दिसत आहेत. संभाषणानंतर कोहलीने रौफला त्याच्या जर्सीवर ऑटोग्राफ देऊन भेट दिली. कोहलीच्या या कृतीने दोन्ही देशातील क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. बीसीसीआयच्या या व्हिडिओला ट्वीटरवर काही वेळातच अनेकांनी लाईक केलं असून विविध कमेंट्सही केल्या आहेत. 


हे देखील वाचा-