KL Rahul, 2022 Asia Cup: भारतीय संघ आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत खास कामगिरी करु शकलेला नाही. भारत सुपर 4 पर्यंत पोहोचला असून अंतिम सामन्यात मात्र पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने स्थान मिळवलं आहे. दरम्यान भारताचे दिग्गज खेळाडू सुरुवातीच्या सामन्यात खास कामगिरी करु न शकल्याचं दिसून आलं. भारताचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) हा देखील स्पर्धेत खास कामगिरी करु शकला नाही. त्याने चारही सामन्यात मिळून 70 धावाच केल्या. दरम्यान याबद्दल बोलताना राहुल म्हणाला की,'शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणे आणि क्रिकेट खेळणे सोपे नव्हते.' दुखापतीमुळे राहुल बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. आशिया चषकापूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले.
'शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणं आणि क्रिकेट खेळणं सोपं नव्हतं'
केएल राहुल म्हणाला, "मला माझा फॉर्म सापडत नव्हता. या स्पर्धेच्या शेवटी मला ती लय सापडली याचा मला आनंद आहे. हाँगकाँगविरुद्ध मला फ्री हिट मिळाली होती, मी तेव्हा षटकारही ठोकला होता. त्यानंतर मी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही काही शॉट्स खेचले, ज्यामुळे मला मी लयीत येत असल्याचं जाणवलं.'' पुढे बोलताना राहुल म्हणाला,"स्पर्धेचा निकाल आमच्यासाठी नक्कीच निराशाजनक आहे. आम्हाला अंतिम सामना खेळायचा होता. पण मागील दोन सामन्यात आम्ही खास कामगिरी करु शकलो नाही. पण ही स्पर्धा आमच्या शिकवणीचा एक भाग होती, आम्ही देशासाठी आणखी सामने जिंकू इच्छित आहोत.''
असं होतं केएल राहुलचं प्रदर्शन
2022 आशिया चषकाच्या पहिल्या चार सामन्यांमध्ये केएल राहुलची बॅट अगदी शांत होती. पहिल्या चार सामन्यांमध्ये राहुलला केवळ 70 धावा करता आल्या. मात्र, अखेरच्या अर्थात अफगाणिस्तान सामन्यात त्याने 62 धावा केल्या. अशाप्रकारे आशिया चषक स्पर्धेतील पाच सामन्यांमध्ये त्याने 26.40 च्या सरासरीने 132 धावा केल्या.
विराट फॉर्मात परत
दुसरीकडे विराट कोहलीनं तब्बल एक हजार दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावलं. त्यानं ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलं. विराट कोहलीचं ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमधलं हे पहिलंच आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं 71वं शतक ठरलं. त्यानं 61 चेंडूंत 12 चौकार आणि सहा षटकारांसह नाबाद 122 धावांची खेळी उभारली.
हे देखील वाचा-