IND vs PAK, Asia Cup 2022: भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) जवळपास तीन वर्षांपासून एकही शतक झळकावता आलं नाही. विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 71 शतक झळकावली आहेत. याचदरम्यान, विराट कोहलीचा सध्या फॉर्म पाहता तो भारताचा माजी स्टार क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकांचा विक्रम मोडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. सचिन तेंडुलकराच्या विक्रमाशी बरोबरी साधण्यासाठी आणखी 29 शतके करावी लागतील. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरनं (Shoaib Akhtar) विराट कोहलीबाबत मोठं वक्तव्य केलंय."विराट कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकणार नाही", असा दावा शोएब अख्तरनं केलाय.


शोएब अख्तर काय म्हणाला?
विराट कोहली हा ऑल टाइम ग्रेटेस्ट प्लेयर बनू शकतो. पण यासाठी विराट कोहलीला तो एक महान खेळाडू असल्याचं इतरांना दाखवून द्यावा लागेल. सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराट कोहलीला आणखी 30 शतकं करावी लागतील. कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहली मैदानात आल्यावर त्याला वेळ मिळेल, पण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्ट्राइक रेटचा मुद्दा असतो, त्यामुळे मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये वेळ कमी असतो. याशिवाय संघाची गरज यांसारख्या गोष्टींचं भान ठेवावं लागतं.


शोएब अख्तरचा विराटला सल्ला
"विराट कोहली हा सकारात्मक आणि आक्रमक खेळाडू आहे. याशिवाय, तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे यात काही शंका नाही. माझी इच्छा आहे की, विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शंभर शतकांचा टप्पा गाठावा आणि सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढावा. परंतु, विराटचा सध्याचा फॉर्म पाहता हे अशक्य वाटत आहे." शोएब अख्तरनं विराट कोहलीला ऑस्ट्रेलियातील विश्वचषक स्पर्धेनंतर टी-20 करिअरचा विचार करण्याची सल्ला दिलाय. शोएब अख्तरच्या मते विराट कोहली मैदानात संघर्ष करताना दिसत आहे. 


विराट कोहलीची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटीत 8 हजार 74 धावा आणि 262 एकदिवसीय सामन्यांमध्ये 12 हजार 344 धावा केल्या आहेत. तर, 101 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 3 हजार 402 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनं कसोटीत 254 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. तर एकदिवसीय क्रिकेटमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 183 इतकी आहे. तर, टी-20 क्रिकेटमध्ये त्याला अद्याप शतक झळकावता आलं नाही.


हे देखील वाचा-