IND vs PAK Asia Cup 2022 : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात आज 'मैदान-ए-जंग' होणार आहे. या बहुप्रतिक्षित सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आशिया कप 2022 मध्ये (Asia Cup 2022) आज भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) असा सामना रंगणार आहे. आशिया कप स्पर्धेतील भारताचा हा पहिला सामना आहे. ही मॅच दुबईमधील इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये संध्याकाळी 07.30 वाजता पार पडणार आहे. याआधी भारत आणि पाकिस्तान संघ चौदा वेळा आशिया कपमध्ये आमने-सामने आला आहे. यामध्ये 13 सामने 50-50 ओव्हरचं झालं असून एक सामना टी-20 फॉरमॅटमध्ये झाला आहे. आशिया कपमधील भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीबद्दलच्या इतिहास काय आहे जाणून घ्या.
1. आशिया चषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे शेवटचे तीन सामने जिंकले आहेत. फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या टी-20 फॉरमॅटमध्ये भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला होता. यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये (वनडे फॉरमॅट) भारताने बाजी मारली.
2. पाकिस्तानने शेवटचा आशिया कपमध्ये भारताविरुद्ध मार्च 2014 मध्ये जिंकला होता. दोन चेंडू शिल्लक असताना पाकिस्तानने हा सामना एका विकेटने जिंकला. शाहिद आफ्रिदीने आर. अश्विनच्या ओव्हरमध्ये दोन षटकार मारून पाकिस्तान संघाला सामन्यात विजय मिळवून दिला.
3. 27 फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध केवळ 83 धावांत ऑलआऊट झाला होता. आशिया कपमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तान संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे.
4. पाकिस्तानने आशिया कपमध्ये भारताविरुद्ध आतापर्यंत तीन वेळा 300हून अधिक धावा केल्या आहेत. पाकिस्तान संघाची सर्वाधिक धावसंख्या 329 आहे. ही धावसंख्या स्कोअर वनडे फॉरमॅटमध्ये बनवण्यात आले आहेत.
5. विराट कोहलीने 18 मार्च 2012 रोजी पाकिस्तानविरुद्ध 183 धावांची इनिंग खेळली होती. आशिया चषक स्पर्धेत फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
6. पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद हाफीज (105) आणि नासिर जमशेद (112) यांनी 18 मार्च 2012 रोजी भारताविरुद्ध आशिया कप सामन्यात पहिल्या विकेटसाठी 224 धावांची भागीदारी केली होती. आशिया कपमधील ही सर्वाधिक भागीदारी केलेली धावसंख्या आहे.
7. आशिया कप भारताच्या अर्शद अयुबने 31 ऑक्टोबर 1988 रोजी पाकिस्तानविरुद्ध 21 धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. आशिया कप स्पर्धेतील भारतीय गोलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
8. रोहित शर्माने आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत 61.16 च्या फलंदाजी सरासरीने आणि 92.44 च्या स्ट्राइक रेटने 367 धावा केल्या आहेत. आशिया कपमध्ये पाकिस्तान संघाविरुद्ध रोहित शर्मा हा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.
9. पाकिस्तानच्या आकिब जावेदने 7 एप्रिल 1995 रोजी भारताविरुद्धच्या आशिया कप सामन्यात 19 धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या. आशिया कपमधील पाकिस्तानी गोलंदाजाची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.
10. आशिया कपमध्ये ऑक्टोबर 1988 आणि एप्रिल 1995 मध्ये झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये एकही षटकार मारला गेला नव्हता.