Asia Cup 2022 : आगामी आशिया चषक 2022 स्पर्धेसाठी पाकिस्तानचा हुकूमी एक्का शाहीन आफ्रिदी (Shaeen Afridi) खेळणार नाही ही माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. तो दुखापतीमुळे आशिया चषक 2022 स्पर्धा खेळणार नाही, अशामध्ये त्याला रिप्लेसमेंट म्हणून कोणत्या खेळाडूला संधी मिळणार या चर्चेला बरच उधाण आलं होतं. मोहम्मद आमिर (Mohammad aamir) वहाब रियाझ (Wahab Riaz) अशी अनुभवी नावं समोर असताना संधी मात्र युवा खेळाडू मोहम्मद हसनैन (Mohammad Hasnain) याला मिळाली आहे.


22 वर्षीय मोहम्मदने 26 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये 8 एकदिवसीय सामन्यांत 6.41 च्या इकॉनमी रेटने 12 तर 18 टी20 सामन्यांमध्ये 7.91 च्या इकॉनमी रेटने 17 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय त्याने 8 वन-डे सामन्यांत 43 धावा तर 18 टी20 मॅचमध्ये 5 धावा केल्या आहेत. अत्यंत कमी अनुभवी असूनही मोहम्मदची गोलंदाजी भेदक असल्यामुळे त्याला या भव्य स्पर्धेसाठी संघात संधी मिळाली आहे. पण मोहम्मद याची बोलिंग अॅक्शन योग्य नसल्यामुळे काही महिने त्याला क्रिकेटपासून दूर रहावं लागलं होतं. पण त्याने केलेल्या बदलामुळे आता त्याला पुन्हा एकदा संघात स्थान मिळालं आहे.


आमिर-रियाझच्या नावाची होती चर्चा


शाहीन आफ्रिदीला श्रीलंका दौऱ्यात दुखापत झाली होती, मात्र तो आशिया कपसाठी तंदुरुस्त होईल, असे मानले जात होते. दरम्यान तो अजूनही दुखापतीतून सावरला नसल्याने शाहीन आफ्रिदीच्या जागी आशिया कपमध्ये कोणाला संधी मिळेल याबाबत अनेक चर्चा होत होती.  मोहम्मद आमिरला (Mohammad aamir) संधी मिळू शकते, असे मानले जात होते तसेच संघाचा अनुभवी गोलंदाज वहाब रियाझ (Wahab Riaz) यालाही संधी मिळेल अशी चर्चा होती. पण अखेर मोहम्मद हसनैनला संधी मिळाली आहे. 



आशिया कपसाठी पाकिस्तान संघ


बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.


कधी, कुठं रंगणार भारत-पाकिस्तान सामना?


आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. 


हे देखील वाचा-