Asia Cup 2022: यूएईमध्ये (UAE) सुरू असलेल्या आशिया चषकातील पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवून सुपर-4 मध्ये स्थान मिळवलंय. भारत या स्पर्धेतील पुढचा सामना रविवारी खेळणार आहे. मात्र, यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का देणारी माहिती समोर आलीय. भारताचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) गुडघ्याच्या दुखापतीमुळं आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडलाय. जडेजाच्या जागी अक्षर पटेलचा (Axar Patel) संघात समावेश करण्यात आलाय. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबात माहिती देण्यात आलीय.
बीसीसीआयचं ट्वीट-
बीसीसीआयनं काय म्हटलंय?
बीसीसीआयनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असं म्हटलंय की, "सध्या सुरू असलेल्या आशिया चषकात अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीनं रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेलची संघात निवड केलीय. रवींद्र जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्यानं त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलंय. सध्या तो बीसीसीआयच्या वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान, अक्षर पटेलची संघात स्टँडबाय म्हणून निवड करण्यात आली होती. रवींद्र जाडेजाच्या दुखापतीमुळं त्याला भारतीय संघात संधी देण्यात आलीय. लवकरच तो भारतीय संघात सामील होईल.
भारताला मोठा धक्का
आशिया चषकादरम्यान रवींद्र जाडेजाचं दुखापतग्रस्त होणं भारतीय संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. रवींद्र जाडेजा सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पाकिस्तानविरुद्ध हायव्होल्टेज सामन्यात त्यानं भारतासाठी 35 धावांचं महत्वाचं योगदान दिलं होतं. तर, हाँगकाँगविरुद्ध त्यानं चार षटकात 15 धावा देऊन 1 विकेट्स घेतली होती.
लवकरच टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा
ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबर आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. आशिया चषकानंतर भारतीय निवड समिती टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. यापूर्वी जाडेजाच्या दुखापतीनं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु, जाडेजाची दुखापत किती गंभीर आहे? याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
आशिया चषकासाठी भारताचा संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
हे देखील वाचा-