नवी दिल्ली : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांना भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला आहे. अजय सिंग बुधवारी झालेल्या बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) निवडणुकीत पुन्हा अध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. त्यांनी आशिष शेलार यांचा 37-27 मतांच्या फरकाने पराभव केला.


गुरुग्राममधील एका हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनच्या (एआयबीए) निरीक्षकाच्या उपस्थितीत निवडणुका घेण्यात आल्या. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या निवडणुका घेण्यात येणार होत्या. मात्र, कोरोना साथीच्या कारण देत दोनदा ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली.


ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेल्या बॉक्सिंगसारख्या खेळावर उत्तरेकडील लॉबीचे पूर्ण वर्चस्व आहे. चार वर्षांपूर्वी बॉक्सिंगमध्ये पदार्पण करणाऱ्या अजय सिंग यांनी आपल्या कार्याने या उत्तरेकडील लॉबीचे मन जिंकले आहे. त्याचबरोबर उत्तराखंडच्या अजय यांना आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये छाप पाडणाऱ्या ईशान्येकडील राज्यांचे समर्थनही मिळाले आहे. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शेलार यांचा पराभव झाला.


‘बीएफआय’च्या निवडणुकीत संलग्न 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या प्रत्येकी दोन प्रतिनिधींना मतदानाचा अधिकार आहे. चार वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत अजय यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी कवळी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. यंदा कवळी यांचा पाठिंबा शेलार यांना असल्याने शेलार अध्यक्ष होतील असेचं सर्वांना वाटत होते.