Virat Kohli : टीम इंडियाचा किंग स्टार फलंदाज विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून तडकाफडकी माघारीचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली. दुसरीकडे, बीसीसीआयला मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करायची आहे. मात्र, मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांमध्ये त्याच्या खेळण्यावर सस्पेंस अजूनही कायम आहे. रजत पाटीदारला इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पदार्पणाची संधी मिळाली, त्याला कोहलीच्या जागी संघात स्थान मिळाले.


तडकाफडकी माघारीचे नेमकं कारण काय? 


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोहलीच्या माघारीची सातत्याने चर्चा रंगली आहे. अनुष्का शर्मा दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगली असतानाच त्याच्या आईची तब्येत बरी नसल्याची चर्चा रंगली. मात्र, आईची तब्येत ठणठणीत असल्याचा खुलासा कोहलीच्या भावाला करावा लागला. यानंतर आता कोहलीचा जिगरी दोस्त एबी डिव्हिलियर्सने कोहलीच्या माघारीवर गुपित फोडून टाकलं आहे. डिव्हिलियर्सने दिलेल्या माहितीनुसार विराट आणि अनुष्काला दुसऱ्या बाळाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे विराट कुटुंबासोबत सर्वाधिक वेळ घालवत आहे. आता डिव्हिलियर्सनेच सांगितल्याने कोहली दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. 






दुसरीकडे, क्रिकबझच्या अहवालात विराट कोहली सध्या भारताबाहेर असल्याचे म्हटले आहे. ज्यामुळे तो इंग्लंडविरुद्धचे शेवटचे तीन कसोटी सामने खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. अहवालात म्हटले आहे की, 'स्टार फलंदाज सध्या देशाबाहेर आहे, त्यामुळे उर्वरित सामन्यांमध्ये त्याच्या उपलब्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.' मालिका सुरू होण्यापूर्वी कोहलीने बीसीसीआयशी चर्चा केली होती आणि वैयक्तिक कारणांमुळे दोन कसोटी सामन्यांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी बीसीसीआयने त्याला परवानगीही दिली होती.


मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर 


इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारत 0-1 ने पिछाडीवर आहे. हैदराबादमधील पहिला सामना इंग्लंडने 28 धावांनी जिंकला होता. पहिल्या डावात 190 धावांची मोठी आघाडी मिळवूनही भारताने सामना गमावला. दुसऱ्या डावात कसोटी पदार्पण करणाऱ्या इंग्लंडचा फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीने भारताच्या 7 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत सामना जिंकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याचवेळी विशाखापट्टणममध्ये उभय संघांमध्ये दुसरी कसोटी खेळली जात आहे. या कसोटीवर भारताने पकड मिळवली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या