मुंबई : अभिनेता आमीर खानच्या 'दंगल' सिनेमाने चीनमध्ये अक्षरश: पैशांचा पाऊस पाडला आहे. चीनमध्ये या सिनेमाने केवळ तीन आठवड्यात तब्बल 725 कोटींची कमाई केली आहे. 'दंगल' ने केलेली ही कमाई चिनी बॉक्स ऑफिसवरची आतापर्यंतची दुसऱ्या क्रमांकाची कमाई आहे.

'दंगल'ने भारतीय बॉक्स ऑफिसपेक्षा चीनच्या बॉक्स ऑफिवर जास्त कमाई केली आहे. भारतात दंगलने 387.38 कोटी रुपये कमावले. आकड्यांचा हिशेब करायचा झाल्यास 'दंगल'ने जगभरात एकूण 1500 कोटींचा टप्पा पार केला आहे.

चिनी भाषेत डबिंग करुन नऊ हजार स्क्रिनमध्ये हा सिनेमा रिलीज करण्यात आला होता. चीनमध्ये हा सिनेमा Shuai jiao baba नावाने प्रदर्शित झाला. याचा हिंदीत अर्थ आहे की, 'आओ बाबा कुश्ती लड़ें'।

या चित्रपटाने तिसऱ्या रविवारी 73 कोटी रुपये कमावले. तर केवळ आठ दिवसात या सिनेमाने 200 कोटींचा गल्ला जमवला होता.

याआधी चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट आमीरचाच होता. आमीर खान आणि अनुष्का शर्माच्या 'पीके' सिनेमाने 140 कोटी मिळवले होते.

दुसरीकडे बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली 2' आणि 'दंगल'मध्ये कमाईचं युद्ध पाहायला मिळत आहे. जगभरात 1538 कोटी रुपयांची कमाई करणारा 'बाहुबली 2' हा भारताचा पहिला चित्रपट ठरला आहे. तर 'दंगल'ही 1501 कोटी रुपयांची कमाई करत, 'बाहुबली 2' ला जोरदार टक्कर देताना दिसत आहे. कमाईच्या बाबतीत 'बाहुबली 2' पेक्षा 'दंगल' केवळ 37 कोटींने मागे आहे.