हैदराबाद: आयपीएलच्या 10व्या मोसमात मुंबई इंडियन्सनं अतिशय थरारक विजय मिळवत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. यावेळी कर्णधार रोहित शर्मानं आपल्या गोलंदाजांची पाठ थोपटली आहे. मुंबई इंडियन्सनं पुण्यासमोर अवघ्या 130 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी करत पुण्याला 128 धावांतच रोखलं.

सामना संपल्यानंतर बोलताना कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, 'मला आता कुठे शांती मिळाली आहे, हा एक क्रिकेटमधील उत्कृष्ट सामना होता. मला संपूर्ण विश्वास आहे की, चाहत्यांनी याचा नक्कीच आनंद घेतला असेल. छोटं लक्ष्य असून सुद्धा आम्ही विजय मिळवला. मी यापेक्षा जास्त काहीही अपेक्षा करत नाही.'

'जेव्हा तुम्ही छोट्या धावसंख्येचा बचाव करता तेव्हा तुम्हाला स्वत:वर प्रचंड विश्वास असणं गरजेचं आहे. मी माझ्या साथीदारांना सांगितलं. जर आपण केकेआरविरुद्ध छोट्या स्कोअरचा बचाव करु शकतो तर इथंही आपण ते करु शकतो. तसंच खेळपट्टीकडूनही आम्हाला मदत मिळाली.' असंही रोहित शर्मा म्हणाला.

'मला माझ्या गोलंदाजांवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे मी त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं होतं. ' असंही रोहित म्हणाला.

'जेव्हा तीन ओव्हर शिल्लक होत्या तेव्हाही मला माझ्या गोलंदाजांवर विश्वास होता. त्यांनी नेहमीच आपली भूमिका नीट पार पाडली आहे. मी त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं. मी त्यांना हे देखील सांगितलं की, तुम्हाला हवी तशी फिल्डिंग लावा.' असं रोहितनं सांगितलं.