मॉस्को: रशियात आयोजित एकविसाव्या फिफा विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी येणारी खेळांच्या दुनियेची जणू दिवाळी. मॉस्कोतल्या ल्युझिनिकी स्टेडियमवर एका दिमाखदार सोहळ्यात या स्पर्धेचं उद्घाटन करण्यात येईल. भारतीय वेळेनुसार रात्री साडेआठ वाजता यजमान रशिया आणि सौदी अरेबिया संघांमधल्या सामन्यानं विश्वचषकाची नांदी होईल.
फुटबॉल विश्वचषकाचा हा सण तब्बल 33 दिवस चालणार असून, या कालावधीत 32 संघ आणि 64 सामन्यांमध्ये मिळून सर्वोत्तम दर्जाचा फुटबॉल पाहायला मिळेल.
रशिया सज्ज
व्लादिमिर पुतिनचा रशिया एकविसाव्या फिफा विश्वचषकाच्या आयोजनासाठी सज्ज झाला आहे. फुटबॉलचा हा विश्वचषक म्हणजे दर चार वर्षांनी साजरी होणारी अवघ्या जगाची दिवाळी.
जगातला सर्वात ब्युटिफुल गेम अशी फुटबॉलची ख्याती आहेच, पण विश्वचषकाच्या निमित्तानं त्याच फुटबॉलच्या सौंदर्यात तब्बल 33 दिवस न्हाऊन निघण्याची तुम्हाआम्हाला संधी मिळणार आहे.
33 दिवस... 32 संघ... आणि 64 सामने... म्हणजे सर्वोच्च दर्जाच्या फुटबॉलची जणू मेजवानीच. याला जगाची दिवाळी नाही म्हणायचं तर दुसरं काय?
खेळांच्या दुनियेचा सार्वभौम राजा
खरं तर तुम्हीआम्ही परंपरेनं सचिन आणि विराटच्या क्रिकेटचे एकनिष्ठ पाईक. क्रिकेट हा आपल्या बहुसंख्यांचा श्वासय. पण फुटबॉल म्हणाल तर, खेळांच्या दुनियेचा सार्वभौम राजा आहे. आणि विश्वचषकाच्या निमित्तानं खेळांच्या जगाची दिवाळी साजरी होणार असेल, तर आपणही त्यापासून कसं दूर का राहणार?
‘फुटबॉलमध्ये जीव रंगला’
म्हणूनच जगाची ही दिवाळी रशियात साजरी होत असली, तरी सोनी पिक्चर्स नेटवर्कनं तुम्हाआम्हाला अगदी घरबसल्या त्या दिवाळीचा आनंद लुटण्याची संधी मिळवून दिलीय. त्यामुळं घराघरातल्या टेलिव्हिजनचा रिमोट आई आणि ताईच्या हातून बाबा आणि बाब्याच्या हातात आलेला दिसला तर नवल वाटणार नाही. मग 'तुझ्यात जीव रंगला'ऐवजी फुटबॉलमध्ये जीव रंगल्याचं आणि फुटबॉलचंच लागिरं झाल्याचं चित्र किमान महिनाभर तरी घराघरांमधून दिसू शकतं.
समजायला सर्वात सोपा खेळ
पण तुम्ही काय म्हणताय? तुम्हाला फुटबॉल समजत नाही? अहो, त्यात काय कठीण आहे? फुटबॉलच्या दुनियेतला नामवंत गुरू बिल शॅन्कलीच्या भाषेत सांगायचं तर फुटबॉलइतका समजायला दुसरा सोपा खेळ नाही.
बिल शॅन्कली म्हणतो... आपापल्या भिडूंकडे चेंडूची देवाणघेवाण करण्याच्या सफाईदार कौशल्याचा हा खेळ आहे. त्यासाठी चेंडूवर नियंत्रण राखण्याचं कसब हे फुटबॉलचं आणखी एक वैशिष्ट्य. आपल्या भिडूनं दिलेला पास स्वीकारून त्यावर गोल करणं किंवा आपल्याला शक्य नसल्यास दुसऱ्या भिडूला गोलची संधी निर्माण करून देणं ही असते या खेळात प्रत्येकावर असलेली जबाबदारी. ही वैशिष्ट्य लक्षात घेतली, तर फुटबॉलचा खेळ समजायला अतिशय सोप्पा आहे.
... तर प्रत्येकाला गोल नोंदवणं शक्य
बिल शॅन्कलीनं सांगितलेल्या फुटबॉलच्या खुबींमध्ये संघभावनेचा मंत्र दडला आहे. एका कुटुंबातल्या, एका सामाजिक संस्थेतल्या, एका राजकीय पक्षातल्या किंवा एका उद्योगसमूहातल्या प्रत्येकानंच आपापली जबाबदारी ओळखून पावलं टाकली, तर त्या त्या चमूला आपापला गोल नोंदवणं सहजसोपं होऊन जाईल.
विवेकानंदांनी फुटबॉलमध्ये पाहिलेला पैलू
आपल्या स्वामी विवेकानंदांनाही फुटबॉलच्या खेळात एक वेगळा पैलू दिसला होता. स्वामीजी म्हणायचे, फुटबॉलचा खेळ म्हणजे देवाच्या जवळ जाण्याची उत्तम संधी. पोथ्यापुराणं वाचून मिळणार नाही, इतकं ज्ञान तुम्हाला फुटबॉल खेळून मिळू शकतं.
पाश्चिमात्य देशांमधल्या वास्तव्यात विवेकानंदांना तिथली युवा पिढी फुटबॉल खेळून सुदृढ होताना आणि त्या सुदृढ युवा पिढीमधून राष्ट्रं घडताना दिसली होती. आपला भारत देशही तितकाच बलशाली व्हावा हे विवेकानंदांचं स्वप्न होतं. त्यासाठीच त्यांनी भारतीयांना फुटबॉल खेळण्याचा उपदेश केला होता.
भारत 97 व्या स्थानी
विवेकानंदांनी केलेला तो उपदेश काही मोजकी राज्यं वगळता, भारतीयांनी फारसा मनावर घेतला नाही. त्यामुळं आज 2018 सालीही फिफाच्या क्रमवारीत भारत 97व्या स्थानावर आहे. आपल्यासाठी आजही क्रिकेट हाच धर्म आहे. सर्वसामान्य भारतीयांची शारीरिक क्षमता आणि त्यांचं अंगभूत कौशल्य लक्षात घेता यापुढच्या काळातही कदाचित क्रिकेट हाच आपला श्वास राहिल. पण रशियातल्या विश्वचषकाच्या निमित्तानं फुटबॉल खेळाची सर्वोत्तमता अनुभवायची आणि या खेळाच्या व्यासपीठावर विश्वबंधुत्वाच्या भावनेत सामील व्हायची संधी मिळणार असेल, तर ती का टाळायची?
फुटबॉलमुळे मानवसमूह एका धाग्यात
जगाच्या पाठीवर आज हजारो भाषा बोलल्या जातात, पण फुटबॉल ही एकच भाषा अशी आहे की तिनं अवघ्या मानवसमूहाला एका धाग्यात बांधून ठेवलंय.
धर्म, वंश, रंग, राष्ट्रीयत्व आदी भेदाभेदांच्या भिंती सहज उन्मळून पाडणारा खेळ आहे फुटबॉल. विश्वचषकाच्या निमित्तानं तर या खेळात साऱ्या जगाची ताकद एकाच व्यासपीठावर एकवटते. फुटबॉलचं तेच विश्वरूप यंदा रशियात साकार होत आहे. फुटबॉलच्या त्या विश्वरुपाचं आपणही भक्तिभावानं दर्शन घ्यायला हवं, नाही का?
संबंधित बातम्या
Fifa World Cup 2018: जगभरात फुटबॉल फिव्हर, उद्यापासून रशियात किक
FIFA World Cup 2018: आजपासून फुटबॉल विश्वचषकाचा थरार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jun 2018 08:50 AM (IST)
फुटबॉल विश्वचषकाचा हा सण तब्बल 33 दिवस चालणार असून, या कालावधीत 32 संघ आणि 64 सामन्यांमध्ये मिळून सर्वोत्तम दर्जाचा फुटबॉल पाहायला मिळेल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -