मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. 14 जून 1968 रोजी जन्मलेले राज ठाकरे वयाची पन्नाशी पूर्ण करत आहेत. वाढदिवसानिमित्त मनसेतर्फे आज पेट्रोल 4 रुपये स्वस्त देण्यात येणार आहे.
मुंबईतल्या 36 विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एका पेट्रोल पंपावर ही सूट देण्यात येईल.
राज्यभरातील अनेक ठिकाणी ही विक्री होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या चढ्या दरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. त्याचाच भाग म्हणून राज ठाकरेंच्या वाढदिनी स्वस्त पेट्रोल देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी 15 दिवसांपूर्वीच ही माहिती दिली होती. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना पेट्रोलचे दर कमी करण्यात सरकारला अपयश येत असल्याची टीका यावेळी मनसेकडून करण्यात आली होती.
मनसेने फक्त टीकाच केली नाही तर एक दिवस का असेना, पेट्रोल दरात मोठी कपात करत 36 ठिकाणी 4 रुपये स्वस्त पेट्रोल देण्यात येणार आहे.
मनसे सरकारमध्ये नसूनही 4 रुपयांनी स्वस्त पेट्रोल देत असेल, तर केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असताना मोदींना हे कसे शक्य नाही, असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
24 एप्रिल ते 13 मेपर्यंत दर स्थिर
कर्नाटक निवडणुकीच्या काळात 24 एप्रिलपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे होते. 24 एप्रिल ते 13 मे पर्यंत मुंबईतील पेट्रोलचे दर 82.48 रुपये इतके होते.
मात्र जसे कर्नाटकात मतदान संपले, तसे 14 मे रोजी दरवाढ करण्यात आली होती. 14 मे रोजी पेट्रोल प्रति लिटर 17 पैसे, तर डिझेल प्रति लिटर 21 पैशांनी महागलं होतं.
इंधनाचे दर दररोज बदलतात. मात्र 24 एप्रिलनंतर म्हणजेच कर्नाटक निवडणुकीदरम्यान या दरांमध्ये बदलच झाले नव्हते. पण मतदान होताच आणि निकाल लागताच, पुन्हा एकदा इंधन दरात चढ-उतार सुरु झाली.
संबंधित बातम्या
मनसेकडून पेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या बर्थडेनिमित्त भेट