1983 World Cup Team Support : देशातील कुस्तीपटू दिल्लीतील जंतर मंतर याठिकाणी कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (brij bhushan singh) यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी कुस्तीपटूंसोबत करण्यात आलेल्या वर्तवणुकीचा 1983 साली विश्वचषक जिंकलेल्या भारतीय क्रिकेट संघाने निषेध नोंदवला आहे.
या क्रिकेटपटूंनी म्हटले आहे की, आमच्या चॅम्पियन कुस्तीपटूंसोबत घडलेल्या प्रकारामुळे आम्ही सर्वजण व्यथित झालो आहोत. त्यांनी त्यांच्या मेहनतीने मिळवलेली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याच्या निर्णयामुळे आम्ही जास्त चिंतेत आहोत. त्या पदकांमध्ये त्यांची वर्षांनुवर्षांची मेहनत, त्याग, दृढनिश्चय आणि जिद्द आहे. ती पदकं केवळ त्यांचाच नाही तर संपूर्ण देशाचा अभिमान आणि आनंद आहे. त्यामुळे घाईमध्ये कोणताही निर्णय न घेण्याचे आवाहन आम्ही त्यांना करत आहोत. त्यांच्या तक्रारी ऐकल्या जातील आणि त्यांचे त्वरित निवारण देखील करण्यात येईल अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे देशातील न्यायव्यवस्थेला त्यांचे काम करु द्या."
आतापर्यंत अनेक लोकांचा पाठिंबा
कुस्तीपटूंनी नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळेस संसद भवनाच्या परिसरात आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकारचा सर्व स्तरातून निषेध करण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कुस्तीपटूंविषयी गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन केले होते. कुस्तीपटूंनी पदकांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कुस्तीपटूंच्या आंदोलनाला आता देशव्यापी पाठिंबा मिळत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध करण्यात येत आहे. आंतरारष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने देखील दिल्ली पोलिसांच्या या कृत्याचा निषेध केला आहे. तसेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने देखील कुस्तीपटूंसोबत झालेल्या कृत्याविषयी हळहळ व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर देखील दिल्ली पोलिसांच्या या कृत्यावर तीव्र शब्दांत टीका करण्यात येत आहे.