IPL 2023 : सॅम करनकडून पंजाब किंग्सला 18.50 कोटींचा चुना? सॅम करनची बॅट कधी चालणार?
आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये 27 व्या सामन्यात पंजाब किंग्ज (PBKS) ला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून (RCB) पराभव स्वीकारावा लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App20 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात (RCB vs PBKS) आरसीबीने पंजाबवर 24 धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासामधील सर्वात महागड्या खेळाडूकडून पंजाब किंग्सला चुना लावला गेला, अशी प्रतिक्रिया नेटकऱ्यांकडून देण्यात येत आहे.
पंजाबच्या या पराभवानंतर भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागनंही (Virendra Sehwag) सॅम करनच्या (Sam Curran) खेळण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या मोसमासाठी झालेल्या लिलावात पंजाब किंग्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. याच कारण म्हणजे पंजाबने सॅम करनला सर्वाधिक किमतीला खरेदी केलं.
आयपीएल लिलावातील सर्व जुने रेकॉर्ड मोडत पंजाब किंग्सने इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला 18.50 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बोली आहे.
पण आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यांमध्ये पंजाब किंग्सला या किंमतीचा काहीही फायदा झालेला नाही. एकाही सामन्यात सॅम करनला त्याच्या किमतीला साजेशी अशी खेळी करता आलेली नाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात सॅम करनने फलंदाजी करत असताना तो वानिंदू हसरंगाकडून धावबाद झाला. सॅम करन 10 धावांवर बाद झाला. या सामन्यात सॅम करनने निष्काळजीपणा केला, ज्यामुळे तो बाद झाला.
यावरून वीरेंद्र सेहवागने त्याला फटकारलं आहे. आयपीएल 2023 मधील सर्वात महागड्या खेळाडूवर सेहवागने निशाणा साधत म्हटलं आहे की, '18 कोटींमध्ये अनुभव विकत घेता येत नाही'.
सेहवाग पुढे म्हणाला की, सॅम करनला 18 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे, त्यामुळे तो संघाला सामना जिंकून देईल, अशी अपेक्षा आहे. पण अजूनही संघाला सॅम करनचा फायदा झालेला नाही.