लखनौचा राजस्थानवर दहा धावांनी विजय; आवेश खान-स्टॉयनिसचा भेदक मारा
LSG vs RR Match Highlights : केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्सने संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. कमी धावसंख्येच्या सामन्यात लखनौच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत राजस्थानच्या फलंदाजांना बाद केले. लखनौने राजस्थानवर 10 धावांनी विजय मिळवला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलखनौने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा संघ 144 पर्यंत मजल मारु शकला. लखनौकडून आवेश खान याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
लखनौने दिलेल्या 155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने संयमी सुरुवात केली. याचा फटका राजस्थानला बसला. यशस्वी जायस्वाल आणि जोस बटलर आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात, पण या जोडीने संथ फलंदाजी केली. जोस बटलर याने 41 चेंडूत 40 धावांचे योगदान दिले. जोस बटलर याचा स्ट्राईक रेट 100 पेक्षा कमी होता..
जोस बटलर याने आपल्या संथ फंलदाजीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. जोस बलटर याच्याशिवाय यशस्वीनेही संथ फलंदाजी केली. यशस्वीने 35 चेंडूत 44 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. यशस्वी आणि जोस बटलर यांनी 11.3 षटकात 87 धावांची भागिदारी केली.
यशस्वी जायस्वाल याला स्टॉयनिसने तंबूत पाठवले. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसन धावबाद झाला... संजूला फक्त दोन धावांचे योगदान देता आले. जोस बटलर यानेही विकेट फेकली.
शिमरोन हेटमायरही आज अपयशी ठऱला. हेटमायरचा अडथळा आवेश खान याने दूर केला. बिनबाद 87 वरुन राजस्थान चार बाद 104 धावसंख्या अशी दैयनिय अवस्था झाली होती.
त्यानंतर पडिक्कल याने एका बाजूने किल्ला सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण त्याला साथ मिळाली नाही. पडिक्कल 26 धावा काढून बाद झाला. ध्रुव जेरल याला खातेही उघडता आले नाही. रियान पराग 15 धावांवर नाबाद राहिला.
लखनौच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच अचूक टप्प्यावर मारा केला. नवीन उल हक याने चार षटकात फक्त 19 धावा दिल्या. आवेश खान याने चार षटकात 25 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत धाडले. तर मार्कस स्टॉयनिस याने दोन विकेट घेतल्या.