KKR vs SRH: हैदराबादचा कोलकात्यावर विजय, हॅरी ब्रूकची शतकी खेळी
ईडन गार्डन्स मैदानावर हैदराबादने कोलकात्याचा 23 धावांनी पराभव केला. 229 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याच्या संघाने निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबदल्यात 205 धावांपर्यंत मजल मारली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांनी शर्थीचे प्रयत्न केले पण ते कोलकात्याला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. नीतीश राणा याने 75 धावांची खेळी केली तर रिंकू सिंह याने 58 धावांचे योगदान दिले.
हैदराबादचा हा दुसरा विजय होय.. हैदराबादकडून मयांक मार्केंडेय आणि मार्को जानसन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
229 धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात गुरबाज शून्यावर बाद झाला.. भुवनेश्वर कुमार याने गुरबाजचा अडथळा दूर केला. त्यानंतर वेंकटेश अय्यर यालाही मोठी खेळी करता आली नाही
वेंकटेश अय्यर 10 धावांवर बाद झाला. सुनील नारायण याला खातेही उघडता आले नाही. त्याशिवाय आंद्रे रसेल याला मोठी खेळी करता आली नाही. रसेल तीन धावांवर बाद झाला.
नारायण जगदीशन याने 36 धावांचे योगदान दिले. जगदीशन याने 21 चेंडूत 36 धावांची खेळी केली. यामध्ये पाच चौकार आणि एक षटकार लगावला. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला कर्णधार नीतीश राणा याने धावांचा पाऊस पाडला
नीतीश राणा याने 41 चेंडूत 75 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने सहा षटकार आणि पाच चौकार लगावले. तर रिंकू सिंह याने पुन्हा एकदा विस्फोटक फलंदाजी केली. रिंकू सिंह याने 31 चेंडूत 58 धावांचे योगदान दिले. यामध्ये चार षटकार आणि चार चौकार लगावले. रिंकू आणि नीतीश राणा फलंदाजी करत असताना कोलकाताला विजयाच्या आशा उंचावल्या होत्या. पण मोक्याच्या क्षणी नटराजन याने नीतीश राणा याला बाद केले. त्यानंतर शार्दुल ठाकूरही 12 धावांवर तंबूत परतला.
रिंकू सिंह याने 58 धावांची नाबाद खेळी केली. रिंकू आणि नीतीश राणा यांनी वादळी खेळी केली, पण इतर फलंदाजांकडून साथ न मिळाल्यामुळे कोलकात्याला पराभवाचा सामना करावा लागला.
दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना हॅरी ब्रूक याच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 228 धावांचा डोंगर उभारला. हॅरी ब्रूक याने विस्फोटक फलंदाजी करत 55 चेंडूत शतक झळकावले. हॅरी ब्रूक याने यंदाच्या हंगामातील पहिले शतक झळकावले.