सॅम करन-अर्शदीप पंजाबच्या विजयाचे हिरो, मुंबईचा 13 धावांनी पराभव
MI vs PBKS, IPL 2023 : अर्शदीप सिंह याच्या चार विकेटच्या बळावर पंजाबने मुंबईचा 13 धावांनी पराभव केला. सूर्यकुमार यादव आणि कॅमरुन ग्रीन यांनी वादळी अर्धशतके झळकावली. पण मुंबईला विजय मिळवून देण्यात त्यांना अपयश आले. कारण, अखेरच्या दोन षटकात अर्शदीप याने अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला विजय मिळवून दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंजाबने दिलेल्या २१५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच संघ सहा विकेटच्या मोबदल्यात २०१ धावांपर्यंत मजल मारु शकला. पंजाबने अखेरच्या पाच षटकात ९६ धावा चोपल्या होत्या. मुंबईला अखेरच्या पाच षटकात ६७ धावा चोपता आल्या नाहीत. दोन्ही संघात हाच मोठा फरक जाणवला.
पंजाबने दिलेल्या २१५ विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. सलामी फलंदाज ईशान किशन अवघी एक धाव काढून तंबूत परतला. मुंबईच्या आठ धावा झाल्या असताना अर्शदीप सिंह याने ईशान किशान याला तंबूत धाडले.
त्यानंतर रोहित शर्माने सर्व सुत्रे आपल्या हातात घेतली. रोहित शर्माने कॅमरुन ग्रीनला सोबत घेत धावसंख्या वाढवली. दोघांनी ७५ धावांची भागिदारी केली.
रोहित शर्मा ४४ धावांची महत्वाची खेळी केली. रोहित शर्मा याने २७ चेंडूत तीन षटकार आणि चार चौकारांच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली. रोहित शर्माने मुंबईच्या डावाला आकार दिला. लायम लिव्हिंगस्टोन याने रोहित शर्माला बाद करत पंजाबला मोठे यश मिळवून दिले. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीन याने सूर्यकुमार यादवला सोबत घेत मुंबईच्या धावसंख्येला आकार दिला.
कॅमरुन ग्रीन याने जबरदस्त अर्धशतकी खेळी केली. कॅमरुन ग्रीन याने ४३ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. या खेळीत कॅमरुन ग्रीन याने तीन षटकार आणि सहा चौकार लगावले... कॅमरुन ग्रीन याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर मैदानाच्या चोहोबाजूने फटकेबाजी केली.
कॅमरुन ग्रीन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव याने सामन्याची सुत्रे आपल्या हातात घेतली. सूर्यकुमार यादव याने आपल्या खास स्ट्राईलमध्ये पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पण मोक्याच्या क्षणी सूर्यकमार यादवला अर्शदीप सिंह याने बाद केले. सूर्यकुमार यादव याने २६ चेंडूत ५७ धावांची खेळी केली. या खेळीत सूर्यकुमार यादव याने तीन षटकार आणि सात चौकार लगावले. अर्शदीपच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव मोठा फटका मारला पण अथर्व तायडे याने झेल घेत पंजाबला मोठे यश मिळवून दिले. अर्शदीपने आठराव्या षटकात सूर्यकुमार यादवला बाद करत पंजाबला सामन्यात परत आणले होते.
१९ व्या षटकात टीम डेविड याने विस्फोटक फलंदाजी करत मुंबईला सामन्यात परत आणले होते. या षटकात टीम डेविड याने १५ धावा वसूल केल्या. अखेरच्या षटकात विजयासाठी १६ धावांची गरज होती. अर्शदीप याने भेदक मारा केला. अर्शदीप याने दोन चेंडूवर दोन फलंदाजांना तंबूत पाठवले. आधी तिलक वर्मा आणि त्यानंतर नेहाल वढेरा यांचा त्रिफाळा उडवला. अखेरच्या षटकात अर्शदीप याने फक्त दोन धावा खर्च केल्या. टीम डेविड १३ चेंडूत २५ धावा करुन नाबाद राहिला.
पंजाबकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अर्शदी याने चार षटकात २९ धावा खर्च करत चार फलंदाजांना तंबूत धाडले. यामध्ये ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांचा समावेश होता. अर्शदीपशिवाय लियाम लिव्हिंगस्टोन आणि नॅथन एलिस यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. पण गोलंदाजीत धावा रोखू शकले नाहीत. नॅथन एलिस याने चार षटकात ४४ धावा खर्च केल्या. तर राहुल चहर याने चार षटकात ४२ धावा दिल्या. लियामने दोन षटकात २३ धावा दिल्या. सॅम करन याने तीन षटकात ४१ धावा खर्च केल्या.